लोकप्रवाह, चोपडा दि.०९ – तालुक्याच्या ग्रामीण भागात विकासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या असून दि.६ रोजी माघारीच्या दिवशी अनेकांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे लढतीचे चित्र बऱ्यापैकी स्पष्ट झाले असून, तालुक्यातील आदिवासी समाजाचे नेतृत्व म्हणून ओळख असणारे डॉ. चंद्रकांत बारेला यांचे समर्थक उमेदवार हे बिनविरोध निवडून आले आहेत. पर्यायाने डॉ.चंद्रकांत बारेला यांची ग्रामीण भागातील पकड आजही कायम असल्याचे यावरुन दिसते.
डॉ. बारेला यांनी वैजापूर गावातील वाद-विवाद मिटवत सामंजस्याने ११ पैकी ३, मुळ्यावतार येथील २ पैकी १, शेनपाणी येथील ३ पैकी ३ तर उमर्टी गृप ग्रामपंचायत मधील ११ पैकी ४ असे सदस्य बिनविरोध झाले आहेत. यापैकी अनेकांनी चोपडा येथे डॉ. चंद्रकांत बारेला यांच्या नारायण वाडी स्थित जनसेवा हॉस्पिटल येथे येऊन भेट घेतली. यावेळी सर्व विजयी उमेद्वारांचे पुष्पहार घालून व गुलाल उधळून स्वागत करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी डॉ. चंद्रकांत बारेला मित्र मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वैजापूर ग्रामपंचायतीत विद्याबाई गुमान बारेला, हर्षाली गुमान बारेला, सुकदेव मगन बारेला हे बिनविरोध झाले असून सरपंच पदासाठी चुरस कायम असणार आहे. उमर्टी येथील कुसुमबाई श्रीराम पावरा, सविता रवींद्र पावरा, करमसिंग रूपसिंग पावरा, महांज्याबाई देवसिंग पावरा हे बिनविरोध झाले असून इथंही सरपंच पदासाठी रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.