लोकप्रवाह, यावल दि.०९ : यावल व रावेर वनविभागाच्या संयुक्त पथकाने केलेल्या कारवाईत रावेर तालुक्यातील रोझोदा येथून एकाच्या घरातून मांडूळ सर्प जप्त करण्यात आला असून, वन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, दि.८ सप्टेंबर रोजी रोझोदा ता. रावेर येथील देवेंद्र गिरधर लिघुरे याच्या राहत्या घरातून वनविभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मांडूळ जातीचा सर्प जप्त करण्यात आला. देवेंद्र लिघुरे याच्याविरुद्ध भारतीय वन अधिनियम १९२७ व वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित आरोपीस अटक करण्यात आली आहे.
सदर कारवाई धुळे वनसंरक्षक दि.वा. पगार यांच्या मार्गदर्शनाखाली यावल उपवनसंरक्षक प्रथमेश हाडपे, यावल पुर्व विभागाचे वनक्षेत्रपाल विक्रम पदमोर, फिरते पथकाचे वनक्षेत्रपाल आनंदा पाटील, रावेर वनक्षेत्रपाल अजय बावणे, रोझोदा पोलीस पाटील, रावेर वनपाल रवींद्र सोनवणे, फैजपूर वनपाल अतुल तायडे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन तडवी, वनरक्षक संभाजी सूर्यवंशी, गोवर्धन डोंगरे, तुकाराम लवटे, सुपडू सपकाळे, कृष्णा शेळके, युवराज मराठे, राजू बोंडल, अरुणा ढेपले, आयशा पिंजारी, सविता वाघ, वाहन चालक आनंद तेली, इमाम तडवी, सचिन पाटील, विनोद पाटील आदिंच्या पथकाने केली आहे.