लोकप्रवाह, चोपडा दि. ०३ मार्च (संदिप ओली) – येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय येथे वाणिज्य व अर्थशास्त्र विभागाच्या वतीने दिनांक 22 फेब्रुवारी 2023 रोजी केंद्रीय अर्थसंकल्प 2023 – 24 यावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. सदर चर्चासत्राप्रसंगी वाणिज्य व अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत सादरीकरण केले. वाणिज्य शाखेच्या प्रथम, व्दितीय व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी ग्रुप करून प्रत्येक ग्रुपला वेगवेगळे विषय देण्यात आले होते. सदर विषयावर सर्व ग्रुपने सविस्तर चर्चा करून सकारात्मक व नकारात्मक या दोन्ही बाजूने चर्चा घडवून आणली.
सदर चर्चासत्रात जवळपास दहा चमूंनी आपले सादरीकरण केले, त्यामध्ये शैक्षणिक बाजू, शेती विषयक, कायदेविषयक, उद्योग धंदे, डायरेक्ट टॅक्स व इनडायरेक्ट टॅक्स, जीएसटी तसेच स्वयंरोजगार व बेरोजगारी त्याचप्रमाणे बजेटची विविध अंगे यावर विद्यार्थ्यांनी वैविध्यपूर्ण चर्चा घडवून आणली. सदर केंद्रीय अर्थसंकल्प सादरीकरण कार्यक्रमात प्रथम बक्षीस रुपये 501, द्वितीय बक्षीस रुपये 401, तृतीय बक्षीस रूपये 301, चतुर्थ बक्षीस रुपये 201, पंचम बक्षीस रुपये 101 अशी एकुण पाच बक्षीसे विद्यार्थ्यांना दिली जाणार आहेत. या कार्यक्रमाची सुरुवात वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. सी. आर. देवरे यांनी प्रास्तविक करून केली. सदर कार्यक्रमाचा उद्देश व विद्यार्थ्यांमध्ये बजेटविषयी जागरूकता निर्माण व्हावी हा या कार्यक्रमाचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाविषयी मनोगत व्यक्त करताना उपप्राचार्य एन.एस. कोल्हे म्हणाले की, अतिशय दर्जात्मक अशा प्रकारचा कार्यक्रम विद्यार्थ्यांनी घडवून आणला. लोकसभा व विधानसभेमध्ये ज्या पद्धतीने चर्चा घडून येते व एकमेकावर ताशेरे ओढले जातात. त्या पद्धतीपेक्षा कितीतरी वेगळी आणि चांगल्या स्वरूपाची चर्चा विद्यार्थ्यांनी याप्रसंगी घडवून आणली असे मत त्यांनी व्यक्त केले.
सदर कार्यक्रमाला महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॕड. संदीप सुरेश पाटील हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी, उपप्राचार्य एन. एस. कोल्हे, व्यवस्थापन विभागप्रमुख अभिजीत साळुंखे, संदीप बी. पाटील, डॉ. एन. सी. पाटील, सहाय्यक प्राध्यापक एच. ए. सूर्यवंशी, पी.एस. जैन, ए. सी.जोशी, पूजा पुनासे व आशा शिंदे आदिंची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चेतन बाविस्कर यांनी केले तर आभारप्रदर्शन अर्थशास्त्र विभागप्रमुख व्ही. पी. हौसे यांनी केले. तसेच परीक्षक म्हणून अर्थशास्त्र विभागप्रमुख व्ही. पी. हौसे यांनी काम पाहिले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
Post Views: 418