लोकप्रवाह, चोपडा दि. ०६ मार्च : स्त्रियांचा प्रवास हा कधीच सोपा नसतो, असे असले तरी स्त्रिया या मुळत: उद्यमशील, अर्थतज्ञ, उत्तम व्यवस्थापिका व खऱ्या अर्थाने ‘बिजनेस वुमन’ असतात. जे एक महिला करू शकते ते कुणालाही शक्य नाही. परंतु स्त्रीला नेहमीच कमी लेखले जाते. आज या सोहळ्यात महिलांना गौरविले गेले, तो आनंद माझ्यासाठी मोठा होता. यापुढेही जेव्हा जेव्हा स्त्रियांना पुरस्कार मिळतील तेव्हा माझा उर भरून येईल. दर्पण पुरस्काराने पुरस्कारार्थी व त्यांच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावरील आनंद फुलवला आहे तो जास्त मोलाचा वाटतो. या शब्दात सुप्रसिद्ध मराठी सिने अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांनी दर्पण पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहून आनंद व्यक्त केला. येथील प्रेरणा दर्पण फाउंडेशनच्या वतीने आनंदराज लॉन्स येथे १ मार्च रोजी सायंकाळी आयोजित ‘दर्पण पुरस्कार – २०२३’ च्या वितरण सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी हे उपस्थित होते. तसेच माजी आमदार कैलास पाटील, मुंबई येथील पोलीस अधीक्षक दीपक देवराज, माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष मनीषा चौधरी, प्रेरणा दर्पण फाउंडेशनचे उपाध्यक्ष डॉ. निर्मल टाटिया आदिंची मंचावर उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलतांना तेजस्विनी पंडित म्हणाल्या की, दर्पण पुरस्कार सोहळ्याची भव्य व्यवस्था बघून चोपडा हे एक मोठे शहर असल्याचीच अनुभूती येते. आम्ही केवळ पडद्यावरचे नायक – नायिका असून रसिकांचे मनोरंजन करतो. त्यातून समाजातील वेगवेगळ्या घटकांच्या समस्या, व्यथा व दृष्टीकोन मांडण्याचा प्रयत्न करतो. परंतु या सोहळ्यातील पुरस्कारार्थी हेच खऱ्या अर्थाने जीवनातील हिरो आहेत. पुरस्कार देण्यासाठी जिगर लागते आणि प्रेरणा दर्पण फाउंडेशनने या पुरस्कारार्थींच्या जीवनात आनंद निर्माण केला आहे. भविष्यात देखील या संस्थेच्या कार्याविषयी माहिती मिळवत राहीन आणि जेव्हा जेव्हा अधिकाधिक महिलांचा या पुरस्काराने सन्मान होईल त्यावेळेस मला अधिक आनंद होईल, असे सांगत त्यांनी संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच सिनेसृष्टीतील आपल्या प्रवासाविषयी थोडक्यात उपस्थितांना माहिती दिली.
या दिमाखदार सोहळ्यात सामाजिक, शैक्षणिक, व्यवसायिक, प्रशासकीय, उद्योजकीय, राजकीय व वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या २५ गुणवंतांचा दर्पण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. प्रीती पंकज पाटील, शे.इमरान शे.हारुन बागवान, सागर काशिनाथ ओतारी, अर्चना राजेंद्र पाटील, स्टीफन विजय सपकाळे, भटू लुका पाटील, सुनील तिलकचंद जैन, अनिल शिवाजी बाविस्कर, रेखा सर्जेराव पाटील, कल्पना सुनील जाधव, कमलबाई पंढरीनाथ व्यास, दिपक पुंडलिक देवराज (मुंबई), दिपक काशिनाथ पाटील (पुणे), गौतम अनुपचंद जैन (तळोदा), भावना पंढरीनाथ माळी (अडावद), श्रीराम दयाराम पाटील (नशिराबाद), अपर्णा किरण पाटील (शेळावे), डॉ. निलेश धनवंत सरवैय्या (मुंबई), प्रकाश रामकृष्ण सैंदाणे (अहमदनगर), योगेश नारायण वाघ (लासूर), शीला सुनील देशमुख (चुंचाळे), अजय शिवाजी पाटील (एरंडोल), वंदना ज्ञानेश्वर भादले (सत्रासेन), इंदिराताई कृष्णराव पाटील (वर्डी), राजेंद्र रामभाऊ सोनवणे (वेळोदे) यांना प्रेरणा दर्पण पुरस्काराने तर श्रीमती शैलजादेवी निकम (माचले) यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सिने अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांच्या हस्ते व माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी आमदार कैलास पाटील, माजी लोकनियुक्त नगराध्यक्षा मनीषा चौधरी यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. स्मृतिचिन्ह, गौरवपत्र, शाल व पुष्पगुच्छ असे सन्मानाचे स्वरूप होते.
अध्यक्षीय भाषणात अरुणभाई गुजराथी यांनी चोपडेकर दर्पण पुरस्कार सोहळ्याची उत्सुकतेने वाट बघत असतात, असे सांगत संस्थेच्या उपक्रमांचे कौतुक केले. याप्रसंगी पुरस्कारार्थीतर्फे भटू पाटील व जीवनगौरव पुरस्कार प्राप्त श्रीमती शैलजादेवी निकम यांनी तसेच संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.निर्मल जैन यांनी मनोगते व्यक्त केली. दर्पण पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन संजय बारी व योगिता पाटील यांनी केले. तर प्रास्ताविक प्रेरणा दर्पण फाउंडेशनचे अध्यक्ष श्यामकांत जाधव यांनी व आभार प्रदर्शन सचिव लतीश जैन यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ॲड. अशोक जैन, वीरेंद्र साळी, चेतन टाटिया, आकाश जैन, निलेश जाधव, अतुल पाटील, लता जाधव यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले. या सोहळ्यास जिल्हा तसेच जिल्ह्याबाहेरूनही अनेकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 14 - येथील चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी वेले येथील बेवारस मनोरुग्ण उपचार व पुनर्वसन...
टिम लोकप्रवाह, चोपडा - तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये असलेल्या आदिवासी पटट्यातील गौऱ्यापाडा येथील आरोपी बाप संजय नानसिंग पावरा (वय 23) याने स्वतःच्या...