टिम लोकप्रवाह, वर्धा दि. ०७ जून (दिलीप पिंपळे) – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी संपूर्ण देशात सिमेंट रस्त्याचे जाळे निर्माण करून समस्त जनतेला चांगले गुळगुळीत रस्ते निर्माण करून दिले, परंतु वर्धा जिल्ह्यातील जामणी येथे त्यांच्याच मालकीच्या असलेल्या साखर कारखान्यावर जाणारी वाट स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे बिकट झाली आहे. या कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांना या रस्त्यामुळे आपला जीव धोक्यात घालून ये जा करावी लागत आहे. या कारखान्यात जवळपास ३००ते ४०० कामगार तिनं पाळीत काम करतात. त्यांना रात्री-अपरात्री कारखान्यात कामावर जावे लागते. परंतु हा कारखाना असलेल्या सुकळी बाई – बांगडापुर हा डांबरी रस्ता संपुर्ण उखडलेला असुन जागोजागी मोठंमोठे खड्डे पडले असून पावसाळ्याच्या दिवसात या खड्यामध्ये पाणी साचून जीवघेणा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या परिसरात दोन विद्यालये असुन या रस्त्यांवरून मदना, मदनी, आमगाव, बोरखेडी, आकोली, तामसवाडा, म्हसाळा, जामणी, सुकळी व येळाकेळी येथील शालेय शिक्षण घेणारे विद्यार्थी रोज मोठ्या प्रमाणात आपल्या सायकलने येजा करतात. या रस्त्यामुळे शाळकरी मुलांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे.
स्थानिक लोकप्रतिनिधीं यांचेकडून जिल्ह्यात रस्त्याची कामे मोठ्या प्रमाणात करण्यात येत असून नेमका गडकरी साहेबांचे कारखान्यासमोरून जाणारा रस्ताच का केल्या जात नाही? हेच न उलगडणारे कोडे आहे. या रस्त्याचे काम त्वरित करण्यात यावे अशी मागणी येळाकेळीच्या संरपच भारती चलाख, सुकळी बाई च्या संरपच जयश्री उडदे, जामणीच्या सरपंच प्रिती गव्हाळे, आकोलीच्या संरपच वैशाली गोमासे, मदनी आमगावच्या सरपंच शुभांगी वानखेडे आदिंसह परिसरातील नागरिकांनी केली आहे.