मित्रहो हा आजचा लेख सर्व त्या बहिणींना समर्पित ज्यांना एक दिवस माहेर सोडून सासरी जावं लागतं.
खरंच मुलगी म्हणून जन्माला येणं आजही या आधुनिक युगात कठीण आहे का? कारण समाजातल्या काही परिवारांमध्ये मुलगी जन्माला आल्यावर तोंड वाकड करण्याची पद्धत आजही आहे. पण त्यात या चिमुकलीच्या काय दोष? आपल्या हिंदू धर्मानुसार आपण दुर्गामाता, शारदादेवी व आपल्या कुलदैवतेची आनंदाने व उत्साहाने पूजा करीत असतो मग आपल्या घरात जन्मलेल्या लक्ष्मीला आपण का नाकारतो? खरंतर ह्या दांभिक समाजाचा एक दुहेरीपणाच वाटतो. प्रत्येकाला आई हवी, बहिण हवी, मैत्रीण हवी व अर्धांगिनी हवी मग ह्या येतील कुठून ? याची देखील सुरुवात एका मुलीचा जन्मापासूनच होत असते हे आपण आधी समजून घेणार.
घरात मुलीचा जन्म होतो. मोठे होईपर्यंत तिचे भरपूर लाडही होतात. उगवतो तो दिवस की ज्या दिवशी तिला माहेर सोडून सासरी जायचं असतं. मित्रहो आपल्याला वाटत तेवढं सोपं नाहीये. ह्या गोष्टीचं महत्त्व तिच्या जन्मदात्या आईलाच व आपला काबाडकष्टातून तिला वाढवणाऱ्या त्या बापालाच असतं. ही तीच मुलगी असते की तिला प्रत्येक गोष्टीचं स्वातंत्र्य आपल्या माहेरी असतं. तीच कोणीतरी ऐकणार असतं, तिच बोलण्याआधी तिला समजणारी लोक तिच्या जवळ असतात. कधी वाटत ही नाही की आपण ज्या मुलीला फुलासारखं जपलेलं आहे ती आता कोणाच्या तरी पारतंत्र्यात जाणार आणि ती आता सर्वांची सेवा त्याठिकाणी करणार. मुलगी सासरी जाताना बापाला आठवतात त्या मुलीच्या छोट्या छोट्या बापाकडच्या मागण्या. बापाला खरतर आता चिंताच वाटत असते की माझ्या आयुष्यातील जिव्हाळ्याच गेल्यानंतर माझ कसं होईल. आईला वाटत की मी जशी एकेकाळी माझ्या माहेरहून आल्यानंतर जो संघर्ष केला तोच संघर्ष माझ्या लेकीला पण आता करावा लागणार. तिला आता सासरी सकाळी सर्वांचा अगोदर उठायचं आहे जी माहेरी सर्वांचा नंतर उठायची व हातात हक्काने चहाची कपबशी हातात मागायची. ज्या मुलील्या आई आग्रहाने जेवू घालत होती आता तिचा आग्रह कोणी करणार नाही हे त्या जन्मदात्या आईलाच माहीत असतं. घरात सगळ्यात जास्त बडबडणारी म्हणजे ती आपली ताईच असते, ती शांत झाली की आई तिला लगेच विचारते बरी आहेस ना. आई सर्वांसमोर रडून तीच दुःख व्यक्त करून घेते पण बापाच्या पाणावलेल्या डोळ्यातलं पाणी मनातील ज्वालामुखीचा जणू उद्रेकच दाखवत असतो हे मात्र खरे. भावाला कळतं माझी बहिण आता माझापासून दूर जातेय आता माझ्याशी भांडेल कोण, वडीलांच्या त्या रागापासून मला वाचवेल कोण? बहिण जातांना मात्र भावाला अश्रू भरलेल्या डोळ्यातून एवढच सांगण्याचा प्रयत्न करते की मी आता जातेय पण माझ्या गेल्यानंतर तू आईवडिलांचा मनोभावे सांभाळ करशील. भावालाही आता एकटेपणाच दुःख जणू अवतीभोवती फिरत असत.
मित्रहो घराचं वैभव असते मुलगी. ती जोपर्यंत आपल्या घरात आहे तोपर्यंतच घरात प्रेम, आदर व वास्तल्य टिकून आहे. मी समाजातल्या सर्व परिवारांना विनंती करतो की तुमच्या घरात तुमची सून नंतर पण कोणाची तरी मुलगी आपल्या घरात येतेय ह्याच भान असू द्या. कारण येणाऱ्या त्या मुलीसोबत बऱ्याच भावना ती घेऊन येते तरी त्या भावनांचा आदर करणे हे आपले आद्य कर्तव्यच आहे. कन्या दिवस आला म्हणजे स्टेटस लावलं तर झालं अस नाही खरंतर ते स्टेटस लावण्यापेक्षा तिला त्या दिवशी विचारा नक्की तुला काय हवंय, ती काहीतरी बोलेल, मन हलकं करेल तुम्ही ते समजून घेतलं आणि त्याचावर खर काम केलेत म्हणजे नक्कीच तो खरा कन्या दिवस साजरा झाला अस सिद्ध होईल. शेवटी माझ्या त्या ताईला एवढच सांगतो की तू ज्या घरी जातेय त्या घरी आधी मुलगी असो किंवा नसो तू त्या घराची मुलगी होऊन राहा. तुझे सासू सासरे न समजता त्यांना आईवडील समज त्यांची काळजी घे त्यांना देखील मुलीची उणीव नको भासू देऊ ते देखील तुला आयुष्य भरासाठी चांगला आशीर्वाद देतील.
लेखन : घनःश्याम डि. पाटील
Mob : 8806874426