टिम लोकप्रवाह, वर्धा (हिंगणघाट) दि. २० : नागपूर येथील विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात आमदार समीर कुणावार यांच्या मागणीनुसार हिंगणघाट येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय देण्याच्या दृष्टीने सुयोग्य जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आज बुधवारी (ता.२०) प्रश्नोत्तराच्या तासाला उत्तर देतांना सांगितले. या घोषणेमुळे बहुचर्चित शासकीय वैद्यकीय महाविद्याल हिंगणघाट येथे होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. शासनाने राज्यात १३ वैद्यकीय महाविद्यालय मंजूर केलेले असून यात वर्धा जिल्ह्याला मिळालेले महाविद्यालय हे हिंगणघाट येथे देण्यात यावे, अशी मागणी हिंगणघाटकरांनी केलेली होती. या मागणीला अनुसरून आमदार समीर कुणावार यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात औचित्याच्या मुद्द्यावर बोलताना हिंगणघाट येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्माण व्हावे, अशी मागणी आमदार कुणावार रेटून धरली. त्याचप्रमाणे नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आमदार कुणावार यांनी विधानसभेच्या पायरीवर बसून धरणे आंदोलन केले. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय न दिल्यास अधिवेशन संपताच आमदारपदाचा राजीनामा देण्याचा इशारा आमदार कुणावार यांनी दिला होता. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जयंत पाटील यांनी प्रश्नोत्तराच्या तासात वर्धेच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे काय झाले? हा प्रश्न उपस्थित केला. त्याच्या उत्तरात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी ही घोषणा केली आहे.
हिंगणघाट येथे आमदार कुणावार यांच्या प्रयत्नाने येथील उपजिल्हा रुग्णालय ४०० खाटांचे श्रेणीवर्धीत करण्यास शासनाने मंजुरी दिली. मात्र यावर समाधान न मानता संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील पिंपळकर यांच्या नेतृत्वात तसेच महिला कृती समितीचे शहरात विविध प्रकारचे आंदोलन सुरु होते. माजी नगराध्यक्ष राजेंद्र डागा यांचाही विविध माध्यमातून पाठपुरावा सुरु होता. शहरात जनभावना तीव्र होत गेल्या. वर्धा येथे सावंगी व सेवाग्राम या ठिकाणी दोन वैद्यकीय महाविद्यालय असून हिंगणघाट परिसरात आरोग्य सेवेचा अभाव आहे. हिंगणघाट मतदार संघातील शहरी आणि ग्रामीण भागाची लोकसंख्या जवळपास साडे पाच ते सहा लाख आहे. हिंगणघाट शहराला राळेगाव तालुक्यातील आदिवासी भाग, यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर-पांढरकवडा, वणी तालुक्याचा संपूर्ण परिसर लागून आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुका, चिमूर तालुका हिंगणघाट शहराला लागून आहे. नागपूर जिल्ह्यातील उमरेड तहसीलचा संपूर्ण भाग हिंगणघाट शहराला लगत आहे. या सर्वांची बाजारपेठ ही हिंगणघाट आहे. त्यामुळे जिल्ह्याला मिळालेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट शहरात व्हावे, ही जनभावना होती, त्याची फलश्रुती म्हणून विधानसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट येथे देण्याची घोषणा केली. या घोषणेनंतर हिंगणघाटकरांना मागणी पूर्ण झाल्याचे समाधान आणि आनंदाचे वातावरण तयार झालेले आहे.
घोषणेवेळी आमदार कुणावार होते सभागृहाचे अध्यक्ष
उपमुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत बुधवारी (ता.२०) २ वाजून ४५ मिनिटाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट येथे देण्याची घोषणा केली. त्यावेळी सभागृह अध्यक्ष म्हणून आमदार कुणावार यांच्याकडे पदभार होता. घोषणा होताच आमदार कुणावार यांनी शासन आणि उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांचे आभार मानले.