टिम लोकप्रवाह, चोपडा दि. ०१ फेब्रुवारी – विद्यार्थ्यांच्या आतील कलागुणांना व सुप्त गुणांना वाव मिळावा या उद्देशाने सद्या सर्व शाळा व विद्यालयांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. याच अनुषंगाने विद्यार्थ्यांसाठी आनंदाचा भाग म्हणून येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित बालवाडी, प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात दिनांक 31 जानेवारी रोजी दुपारी बारा ते सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान एक दिवशीय `रंगतरंग” या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अविनाश पाटील यांच्या हस्ते झाले. कार्यक्रम अध्यक्षस्थानी अविनाश पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेविका शुभांगी पाटील, सुरेखा महाजन, जळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे सहसचिव संभाजीराजे पाटील, ग. स.चे संचालक मंगेश भोईटे, वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. सचिन काटे, चहार्डी येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज शहर वाचनालयाचे अध्यक्ष व सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक किशोर बाविस्कर आदिंची उपस्थिती होती. कार्यक्रमाला महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या सचिव डॉ. स्मिता संदीप पाटील यांनीही भेट देऊन कार्यक्रमाची प्रशंसा केली.
यावेळी गटशिक्षणाधिकारी अविनाश पाटील बोलताना म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या आत मध्ये लपलेल्या कलागुणांना व सुप्त गुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम शाळांमध्ये होणे महत्त्वाचे असते. महात्मा गांधी बालवाडी, प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाची उत्तुंग भरारी असून प्रास्ताविकेतून शाळेची प्रगती समजली व तसेच या पेक्षाही जास्त प्रगती होण्यासाठी आपण प्रयत्न करत रहावे असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी व्यासपीठावर महात्मा गांधी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एन. एस. सोनवणे, प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक भूपेश सोनवणे हे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक निळकंठ सोनवणे यांनी केले. तर पाहुण्यांचा परिचय राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त माध्यमिक शिक्षक तथा जळगाव माध्यमिक शिक्षक पतपेढीचे संचालक संजय सोनवणे यांनी केले.
सूत्रसंचालन प्राथमिक विभागाचे शिक्षक योगेश खैरनार यांनी केले, तर सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी चैताली पाटील हिने केले आणि शेवटी आभार प्रदर्शन मुख्याध्यापक भूपेश सोनवणे यांनी केले. संपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमाची धुरा कलाशिक्षक व चोपडा येथील माध्यमिक शिक्षकांच्या पतपेढीचे अध्यक्ष दिनेश बाविस्कर यांनी सांभाळली व उत्कृष्ट कार्यक्रमाचे सादरीकरण केले.
Post Views: 64