टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या प्रायोजकत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी उत्सवात रोख २१ हजार १११ रुपये व सन्मानचिन्ह असे पारितोषिक ठेवण्यात आले होते.

या उत्सवात चोपडा शहरातील एकूण सात गोविंदा पथकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यामध्ये क्रिडा शिक्षक नरेंद्र महाजन व समाधान माळी यांच्या मार्गदर्शनाखालील शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने महात्मा फुले नगर मित्र मंडळाच्या सहकार्याने तब्बल पाच थर रचत दहीहंडी फोडण्याचा मान पटकाविला. चोपडा शहरात पहिल्यांदाच पाच थर रचत ऐतिहासिक कामगिरी केल्याने शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीच्या गोविंदा पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या कामगिरीसाठी अल्केश महाजन, विठ्ठल महाजन यांच्यासह शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीचे सर्व पदाधिकारी तसेच महात्मा फुले नगर मित्र मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

चोपडा शहराला लाभलेला समृद्ध सामाजिक व सांस्कृतिक वारसा जपत चोपडा शहर सामाजिक व सांस्कृतिक समितीच्या वतीने दहीहंडी उत्सवाचे उत्कृष्ट आयोजन करण्यात आले होते. उत्सवात सहभागी झालेल्या गोविंदा पथकांनी आपल्या कौशल्याचे आणि संघभावनेचे दर्शन यावेळी दाखविले. या विजयामुळे शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, पाच थरांची ही ऐतिहासिक कामगिरी चोपडा शहरातील दहीहंडी उत्सवाच्या इतिहासात नोंदली गेली आहे.













