टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले मानधन अखेर प्रभाग संघाच्या (CLF) माध्यमातून त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले आहे. एप्रिल ते जून तसेच जुलै ते ऑगस्ट २०२६ या कालावधीतील मानधनाची रक्कम यशस्वीरीत्या वर्ग करण्यात आल्याने महिला कॅडर्समध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षाकडून करण्यात आलेल्या सातत्यपूर्ण व प्रभावी पाठपुराव्यामुळे राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान (NRLM) अंतर्गत मानधनाची रक्कम प्राप्त झाली. त्यानंतर संबंधित प्रभाग संघांनी ‘उमेद’च्या आदेशानुसार कॅडर्सच्या बँक खात्यावर मानधन वितरणाची कार्यवाही तातडीने पूर्ण केली.

दरम्यान, सप्टेंबर महिन्याचे मानधन अग्रीम राशी म्हणून यापूर्वीच जमा करण्यात आले आहे. तसेच ऑक्टोबर व नोव्हेंबर २०२६ या पुढील दोन महिन्यांचे मानधनही येत्या काही दिवसांत प्रभाग संघ स्तरावर अग्रीम स्वरूपात जमा होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

रखडलेले मानधन मिळाल्याने जिल्ह्यातील ‘उमेद’च्या महिला कॅडर्सना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांच्या आर्थिक अडचणी काही प्रमाणात दूर होण्यास मदत होणार आहे. या कार्यवाहीबद्दल कॅडर्सकडून जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षाचे समाधान व्यक्त करण्यात येत आहे.












