टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 15 : दिवाळी हा आनंदाचा आणि उत्साहाचा सण प्रत्येक कुटुंबाला आनंदाने साजरा करता यावा, या सामाजिक भावनेतून जन मानवता बहुउद्देशीय संस्था व कॅन्सर पेशंट हेल्प सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने कॅन्सरग्रस्त कुटुंबांना रेशन किट तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यंदाही आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम शहरातील ए. पी. जे. अब्दुल कलाम कम्युनिटी हॉल येथे पार पडला.

कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी झुंज देणाऱ्या रुग्णांच्या कुटुंबांना आर्थिक आणि मानसिक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत सणासुदीच्या काळात या कुटुंबांनाही आनंदाचे काही क्षण अनुभवता यावेत, तसेच त्यांच्या गरजांना हातभार लागावा, या उद्देशाने संस्थेच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या रेशन किटचे, तर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाला चोपडा शहराच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा नम्रता पाटील, उपनगराध्यक्ष पंकज बोरोले, नगरसेवक गजेंद्र जैस्वाल, प्रवीण देशमुख, आरिफ शेख सिद्दीक, डॉ. फारूक चिरागोद्दीन शेख, हाजी आसिफ सय्यद, सलीम मिस्त्री, सत्तार वलीउद्दीन आणि सामाजिक कार्यकर्ते बिलाल शेख आदी मान्यवर उपस्थित होते. सदर उपक्रमासाठी पंकज ग्रुपचे अध्यक्ष डॉ. सुरेश बोरोले, विवेकानंद हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ. विकास हरताळकर आणि एम. व्ही. पाटील आदींचे मोलाचे सहकार्य लाभले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जन मानवता बहुउद्देशीय
संस्थेचे अध्यक्ष राज मोहम्मद खान शिकलगर, अयान शिकलगर, इरतेजा शेख आणि सिराज खान आदींनी विशेष परिश्रम घेतले.
सामाजिक बांधिलकी जपत कॅन्सरग्रस्त कुटुंबांच्या चेहऱ्यावर दिवाळीचा आनंद फुलविण्याचा संस्थेचा हा उपक्रम उपस्थितांकडून कौतुकास पात्र ठरला.












