कोल्हापूर : सख्ख्या भावालाही ओळख न दाखविणाऱ्यांची संख्या समाजात वाढू लागली असताना रस्त्यावर काचेच्या बाटल्या गोळा करून पोट भरणाऱ्या व जेम्सस्टोन व्यापारी संकुलाच्या पायरीवर गेली अनेक दिवस झोपणाऱ्या शाळेतील ३३ वर्षांपूर्वीच्या वर्गमित्राला नवे जीवन देण्याचा प्रयत्न येथील सेंट झेविअर्स शाळेतील १९८९ च्या बॅचमधील मित्रांनी सुरू केला आहे.
विवेक चिटणीस (वय ४९, रा. मूळ राजारामपुरी), असे त्या मित्राचे नाव आहे. सध्या त्यांना सावली केअर सेंटरमध्ये ठेवले आहे. विवेकचा शोध आणि त्यांना पुन्हा जीवनात उभे करण्याची मित्रांची धडपड याला समाजाने सलामच करायला हवा. मित्रच मित्रासाठी काय करू शकतात याचे हे जगात भारी उदाहरण कोल्हापूरने घालून दिले आहे. त्यातून माणुसकीचा धागाच अधिक बळकट झाला. हे सगळे रविराज निंबाळकर, अमर क्षीरसागर, तुषार पाटील, अभिजित भोसले, शिरीष पाटील, प्रदीप मुदलियार व इतर मित्रांनी मित्रासाठी केले. जे घडले ते सारेच अचंबित करणारे.
विवेक चिटणीस हे सेंट झेविअर्सचे माजी विद्यार्थी. वर्गात अत्यंत हुशार. त्यांचे आई व भाऊ सध्या अमेरिकेत. विवेक स्वत: कोल्हापुरातील नामांकित हॉटेलमध्ये व्यवस्थापक होते. चांगले सुंदर आयुष्य सुरू होतं; परंतु काही कारणांतून व आर्थिक फसवणुकीतून वैफल्य आले. मनस्थिती बिघडली. नोकरीही सोडली. रस्त्यावरील रिकाम्या बाटल्या गोळा करून त्या विकायच्या व मिळेल ते पोटाला खावून जगायचे असा दिनक्रम.
चार-पाच दिवसांपूर्वी रविराज निंबाळकर यांना ते दाभोळकर कॉर्नरला पाठीवर पोते घेऊन बाटल्या गोळा करताना आढळले. त्यांचा विश्वासच बसला नाही. त्यांनी शाहूपुरी पोलिसांकडे जाऊन सीसीटीव्ही फुटेज पाहिले. ते बॅचच्या ग्रुपवर शेअर केले. शुक्रवारी दुपारी विवेक दामिनी हॉटेलच्या दारातून निघालेले तुषार पाटील यांना दिसले. त्यांनी त्यांची पाठ सोडली नाही. कनाननगरच्या कोपऱ्यावर थांबल्यावर त्यांनी मोबाइलवर फोटो घेतले व ते ग्रुपवर शेअर केले.
पुढच्या काही मिनिटांत आठ-दहा मित्र लगेच गोळा झाले. रविराज यांनी विवेकशी संवाद साधल्यावर त्यांनी सगळ्यांना ओळखले. हस्तांदोलनही केले. लगेच त्याला मित्रांनी खाऊ घातले. मानसिक आधार दिला. आधीच नियोजन केल्यानुसार सावलीमध्ये नेऊन दाखल केले. मित्रांनीच त्याच्यासाठी नवे कपडे घेऊन दिले. त्यांच्यासाठी आता नोकरीचा शोध सुरू आहे. एक भरकटलेले आयुष्य पुन्हा मित्रप्रेमामुळे नव्याने फुलत आहे.
डोळ्यात पाणी…
तुम्ही माझ्या आयुष्यात देव म्हणून आलात..नाही तर मी जीवनाला पार वैतागलो होतो रे..पंचगंगा नदीत उडी घेऊन मी जीवन संपवणार होतो..उद्याचा माझा दिवस शेवटचाच होता अशा भावना मित्र भेटल्यावर विवेकने व्यक्त केल्या आणि सर्वच वर्गमित्रांच्या डोळ्यांत पाणी आले.