लोकप्रवाह, चोपडा दि. २० जुलै – शहरातील जवळपास सर्वच मुख्य रस्त्यांची भयानक दुर्दशा झाल्यामुळे शहरवासिय संताप व्यक्त करीत आहेत. सर्व मुख्य रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय अशी झाली आहे. यामुळे नागरिकांंच्या मनात असंतोष निर्माण झाला असून येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत याचे परिणाम दिसतील हे मात्र नक्की !शहरातील प्रत्येक भागातील रस्ते हे अमृत योजनेंतर्गत पाईपलाईन टाकणेकामी खोदण्यात आले. मात्र ती रस्ता दुरुस्ती किंवा रस्ता नुतनीकरण केव्हा होणार ? हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडत आहे. खराब व निकृष्ट रस्ते बांधकाम करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे तसेच संबंधित जवाबदार अधिकाऱ्यावर सुद्धा योग्य ती कारवाई व्हावी ही मागणी जोर धरु लागली आहे.
नुकताच काही महिन्यांअगोदर तयार करण्यात आलेला कस्तुरबा शाळेपासुन ते हरेश्वर मंदिर पुलापर्यंतचा रस्ता(साधारण दोन ते अडीच कोटीचा) हा सद्या त्याच्या विशिष्ट गुणवत्तेमुळे शहरात व समाजमाध्यमांमध्ये चर्चिला जात आहे. कारण त्या रस्त्याला ठिकठिकाणी खड्डे पडत असल्यामुळे ते काम किती गुणवत्तापुर्ण झाले आहे ? याबाबत शंका उपस्थित होत आहे. हरेश्वर पुलावरच रस्त्याचा जवळपास अर्धा भाग हा खड्ड्यामुळे व्यापलेला आहे. त्यावर थातूरमातूर मलमपट्टी करण्यात आली आहे मात्र ती ही काही दिवसचं टिकेल असे दिसतय.
वर दिलेले फोटो हा परिश्रम मंडपम जवळील खड्ड्याचा आहे. यामध्ये १ नंबरचा फोटो हा दिनांक ११ जुलै रोजीचा आहे. रस्त्याला तडे पडत असल्याचे म्हणजेच काही दिवसानंतर येथे खड्डा होणार हे निश्चित होतं ! २ नंबरचा फोटो हा १४ जुलैचा आहे आणि ३ नंबरचा फोटो हा आजचा म्हणजे दिनांक २० जुलैचा आहे. फोटोमध्ये तड्याचे दिवसेंदिवस खड्ड्यात रुपांतर होत असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे दिनांक ११ जुलैलाच नगरअभियंता सचिन गंवादे यांना लोकप्रवाह चे संपादक संदिप ओली यांनी याबाबत निदर्शनास आणून दिले मात्र काही उपयोग झाला नाही असे दिसते. त्यांच्याशी या रस्त्याबाबत चर्चा केली असता संबंधीत ठेकेदाराला खड्डे बुजविणेकरीता सांगण्यात आले आहे असे सांगितले. आणि जर का संबंधित ठेकेदाराने रस्ता दुरुस्ती न केल्यास ठेकेदाराच्या नगरपालिकेकडे असलेल्या डिपॉझिट रक्कमेतून दुरुस्ती करण्यात येईल असे त्यावेळी सांगितले. मात्र अद्याप काही होतांना दिसत नाही.
अग्रेसन नगर जवळील हरेश्वर रस्त्यावर खताच्या गोण्यांनी भरलेला ट्रकचे मागील चाक रस्त्यात घुसून गेल्यामुळे शेवटी जागेवरच ट्रक खाली करुन जेसीबी मशीनच्या साहाय्याने काढण्यात आला. यामुळेच मागील काही महिन्यांमध्ये तयार झालेल्या या नवीन रस्त्याच्या गुणवत्तेबाबत शहरवासियांना शंका उपस्थित होत आहे. याबाबतीत माजी नगरसेवक डॉ. रविंद्र भास्कर पाटील हे एकमेव लोकप्रतिनिधी या समस्यांबाबत समाजमाध्यमांवर आवाज उठवत आहेत.
वरील फोटो हे गोलमंदीर ते चावडी दरम्यानचे आहेत. यामध्ये रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या प्रयत्नात सर्वदुर चिखलमय वातावरण तयार झाले व याची चर्चा दिवसभर शहरातील प्रत्येक समाजमाध्यमांवर होत होती. याबाबत सुद्धा लोकप्रवाहने नगरअभियंता सचिन गवांदे यांच्याशी संपर्क साधता, खड्डे बुजविण्याकामी लागणाऱ्या मुरुमकरीता परमिट तहसीलमार्फत मिळत नसल्याचे सांगण्यात आले. म्हणून तात्पुरत्या स्वरुपात खड्डे बुजविण्याचा प्रयत्न केला मात्र तिथे चिखल झाला. तरी लवकरच योग्यरीतीने खड्डे बुजविण्यात येतील असे सांगितले.
एकंदरीत या सर्व रस्त्यावरील खड्डे बुजविणेबाबत प्रशासनाने गांभिर्य घ्यावे कारण आता पावसाळ्याची सुरुवात आहे जर पावसाने जोर धरला तर आता आहे त्यापेक्षा कितीतरी पटीने खराब परिस्थीती रस्त्यांची होवू शकते. म्हणून तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी जोर धरत आहे.