जळगांव, 21 जुलै : गोरगरीब रुग्णांच्या भाबडेपणाचा फायदा घेत, वैद्यकीय परवाना नसताना अवैधरित्या दवाखाना रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या पाच डॉक्टरांचे बिंग चाळीसगावात फुटले आहे. तालुक्यातील विविध गावांमध्ये या बोगस डॉक्टरांनी थाटलेल्या दवाखान्यांवर गटविकास अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांनी नेमलेल्या पथकाने छापा टाकल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
चाळीसगाव तालुक्यात एकूण पाच बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली आहे. तर कारवाईची कुणकुण लागताच काही बोगस डॉक्टरांनी पळ काढला. बोगस डॉक्टरांची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून केली जात होती. दोन महिन्यांपूर्वी तालुक्यातील २५० वैद्यकीय व्यवसायीकांनी तहसील कार्यालयात यासंदर्भात मागणी केली होती.
तालुक्यातील बोगस डॉक्टर शोधून त्यांच्यावर कारवाईसाठी वैद्यकीय अधिकारी, आरोग्य विस्तार अधिकारी व आरोग्य सहाय्यक अशा तिघांचा समावेश असलेली एकूण 18 जणांचे 6 पथके तयार करण्यात आली होते. यात तालुक्यात विविध ठिकाणी छापे टाकून कारवाई केली. यात डॉ. मिनल टी. सरकार (उपखेड), शहजाद कोमल मुजूमदार (पोहरे) व तन्मय दीपक पाठक (पिलखोड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर राजू बिस्वास वाघले ( कोंगानगर ) व डॉ. बंगाली (रांजणगाव) या दोन बोगस डॉक्टरांवर चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यापैकी डॉ . बंगाली पसार झाला आहे.
दोन आठवड्यांपूर्वी धुळ्यातील प्रकार
आदिवासी भागात छुप्या पद्धतीने डॉक्टरी व्यवसाय करून रुग्णांच्या जीवाशी खेळ चालविला जात आहे. याबाबत पोलिसात झालेल्या तक्रारीनंतर कारवाईच्या भीतीने बोगस डॉक्टर फरार झाले आहेत. शिरपूर तालुक्यातील आदिवासी भागातील विविध गावांसह दुर्गम गाव, पाड्यात बंगाली व अन्य बोगस डॉक्टरांनी धुमाकूळ घातला आहे. वकवाड, दुर्बड्या, शेमल्या, मोहिदा, उर्मदा, पनाखेड, खैरखुटी, बटवापाडा यांसह अन्य गावांतील रुग्णांना ओव्हरडोस देऊन बोगस डॉक्टरांकडून उपचार होत असल्याची महिती आहे. ग्रामस्थांकडून तालुका वैद्यकीय अधिकारी (शिरपूर) डॉ. राजेंद्र बागूल यांच्याकडे बोगस डॉक्टरांविषयी लेखी स्वरूपात तक्रार देण्यात आल्या आहेत. त्यांनी तक्रारीची दखल घेत बुधवारी (ता. ६) जिल्हा आरोग्याधिकारी (धुळे) डॉ. नवले यांच्यासह सांगवी पोलिस ठाण्याच्या पथकासह पनाखेड येथे दाखल झाले. मात्र बोगस डॉक्टरांना याची आधीच चाहूल लागल्यामुळे दवाखाना बंद करून ते फरारी झाल्याचे निदर्शनास आले. गावात फिरून चौकशी करण्यात आली. बोगस डॉक्टरांविरोधात गुन्हे दाखल करण्यात येतील व त्यांच्याविरुद्ध शोधमोहीम सुरू आहे. बोगस डॉक्टर लोकांना खरे डॉक्टर असल्याचे सांगत होते. त्यांचाही दवाखाना कारवाईच्या भीतीपोटी बंद आढळल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे.