लोकप्रवाह, चोपडा दि. २२ जुलै – साधारण पाच वर्षापुर्वी साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरु करणेसाठी चेअरमन अतुल ठाकरे यांच्या सांगण्यावरुन घर बँकेकडे तारण ठेवून कर्ज काढून रक्कम रु. १७ लाख दिले मात्र वारंवार मागणी करुन सुद्धा अद्यापपावेतो ती संपुर्ण रक्कम परत न मिळाल्यामुळे माजी जिल्हा परिषद सदस्य व चोसाका तज्ञ संचालक बाळासाहेब उर्फ विजय दत्तात्रय पाटील यांनी चोसाका चेअरमन अतुल ठाकरे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल होवून न्याय मिळावा अश्या आशयाचे निवेदन चोपडा शहर पोलीस स्टेशन येथे दिले.
त्यांनी निवेदनात म्हटले की, चोपडा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अतुल भिमराव ठाकरे यांच्या म्हणण्यावरुन कारखान्याचा गळीत हंगाम सुरु होणे करीता घर बँकेकडे गहाण ठेवून कर्ज काढून दि. १७/ ११/ २०१७ रोजी रु.१७,००,०००/- (अक्षरी सतरा लाख मात्र) इतकी रक्कम कारखान्यास दिली होती. सदर रक्कम त्याच वर्षी साखर विकून परत देण्याचे आश्वासन कारखान्याचे चेअरमन अतुल भिमराव ठाकरे यांनी दिले होते. परंतु त्यांनी जाणुन बुजून हेतुपुरस्कर मला सदर रक्कम त्याच वर्षी दिली नाही व टाळाटाळ करुन मला फसविलेले आहे असा आरोप बाळासाहेब पाटील यांनी निवेदनाद्वारे केला.
चेअरमन यांनी साखर विकून बँकेत पैसे परत भरु असे मला सांगितले. मी मित्रत्वाच्या नात्याने त्यांचेवर विश्वास ठेवून त्यांना पैसे दिले होते. तद्नंतर काही कारणास्तव सदर साखर कारखाना हा बंद पडला. संपूर्ण रकमेची मागणी केलेली असता त्यांनी मला काही प्रमाणात पैसे तुकडे तुकडे करुन जवळपास साडे नऊ लाख इतकी रक्कम परत केली असल्याचा उल्लेखही सदर अर्जावर केला आहे.
त्यांना संपूर्ण रक्कम वारंवार मागणी करीत असतांना मला पैसे देण्याचे टाळाटाळ करीत आहे. कारखान्याकडे रक्कम उपलब्ध असतांना चेअरमन अतुल ठाकरे यांनी माझे पैसे मला परत दिलेले नाही. या सर्व आर्थिक विवंचनेमुळे माझी मानसिक स्थिती अत्यंत खराब झालेली असून मला जानेवारी २०२१ रोजी हार्ट अटॕक आलेला होता असेही म्हटले आहे. तसेच कर्ज घेतलेली रक्कम परतफेड न केल्यामुळे बँकेने कलम १३८ अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. व्याज दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे कर्ज रक्कम दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सिबील स्कोर सुद्धा खराब झाले असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
या सर्व प्रकारामुळे माझी मानसिक स्थिती बिघडली असून यामुळे माझ्या जिवाला धोका निर्माण झालेला आहे. तसेच माझे काही बरेवाईट झाल्यास त्यास चेअरमन अतुल ठाकरे हे जबाबदार राहतील तसेच अतुल ठाकरे यांचेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल व्हावा असे बाळासाहेब उर्फ विजय दत्तात्रय पाटील यांनी पोलीस अधिक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
याबाबत चोसाका चेअरमन अतुल ठाकरे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, बाळासाहेब पाटील यांनी १७ लाख रुपये इतकी रक्कम कारखान्यास दिली हे कागदोपत्री सिद्ध करुन दाखवावे. तसे झाल्यास तात्काळ रक्कम दिल्या जाईल व याबाबत लवकरच पत्रकार परिषद घेवून भुमिका स्पष्ट करु असे सांगितले.