लोकप्रवाह, मुंबई : शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना ईडीने अटक केली तशी सगळीकडे एकच चर्चा झाली. पत्राचाळ पुनर्विकासात गैरव्यवहार झाला, यात संजय राऊतांचाही सहभाग होता. असा आरोप राऊतांवर आहे.
काय आहे पत्रा चाळ प्रकरण
मुंबई येथील गोरेगाव परिसरातील सिद्धार्थनगर येथे पत्रा चाळ आहे. या चाळीच्या पुनर्विकासासाठी रहिवाशांनी म्हाडा आणि बिल्डर यांच्यात एक करार केला. पत्राचाळ १३ एकरमध्ये होती. त्यातील ४ एकरमध्येच सदनिका असतील तर आणि उर्वरित भाग गुरुआशिष बिल्डर आणि म्हाडाचा हक्क राहिल असा तो करार होता. मात्र या चाळीची जमिन परस्पर विकली गेली आणि हा प्रोजेक्ट रखडला. यात ६७२ लोकांना घर मिळणार होतं. मात्र ती अद्याप मिळालेली नाही. गुरुआशिष या कंपनीचे माजी संचालक आहेत. ईडीने प्रविण राऊतांना फेब्रुवारी २०२२ मध्ये अटक केली आहे. पत्रा चाळ विकास तर रखडलाच मात्र रहिवाश्यांना अद्याप घरही मिळालेली नाही. जमीन विकून आलेल्या पैशातून अलीबाग येथे संजय राऊतांनी संपत्ती विकत घेतल्याचा आरोप आहे. तसेच गुरुआशिषचे माजी संचालक प्रविण राऊतांनी जमीन विक्रितून ९०० कोटी कमावले असंही ईडीने म्हंटलंय.
स्वप्ना पाटकर कोण आहेत ?
संजय राऊतांच्या चर्चेबरोबरच स्वप्ना पाटकर हे नावही वारंवार माध्यमात दिसत होतं. स्वप्ना पाटकर या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात. पत्रा चाळ प्रकरणात संजय राऊतांना रविवारी 31 जुलैला रात्री उशिरा अटक झाली. ही अटक स्वप्ना पाटकारांच्या तक्रारीमुळे झाल्याचं सांगण्यात येतं. दरम्यान संजय राऊत आणि स्वप्ना पाटकर यांची एक ऑडीओ क्लिपही व्हायरल झाली. स्वप्ना पाटकर यांनी संजय राऊत आपल्याला धमकावत असल्याचं आणि त्यांच्यापासून धोका असल्याची तक्रार नोंदवली होती. स्वप्ना पाटकरानी दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी राऊताच्या विरोधात भारतीय दंड संहिता विधान 509 , 506 आणि 504 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. संजय राऊतांच्या विरोधात ED ला स्वप्ना पाटकरांनी (Swapna Patkar) साक्ष दिली. ही साक्ष मागे घेण्यात यावी यासाठी त्यांच्यावर दबाव टाकण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. स्वप्ना पाटकरांना पोलिसांचं संरक्षण देण्यात आलं आहे. स्वप्ना पाटकर या ४० वर्षाच्या असून मुंबईत राहतात. त्या पत्रा चाळ प्रकरणातील मुख्य साक्षीदार आहेत. पत्रा चाळ प्रकरणात १०३४ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचं सांगितलं जात आहे. स्वप्ना पाटकर या मनोविकारतज्ञ असून सांताक्रुज मध्ये राहतात. त्याचं एक क्लिनिक देखील आहे. तसेच त्यांनी २०१५ मध्ये ‘बाळकडू’ ह्या चित्रपटाची निर्मिती केली होती.
2007 मध्ये त्या संजय राऊतांना पहिल्यांदा भेटल्या होत्या. पुढे स्वप्ना पाटकर आणि त्यांच्या कुटुंबियांचे बंध घट्ट झाले. संजय राउतांना स्वप्ना पाटकरांनी त्यांच्या बिझनेस पार्टनर व्हावं असं वाटत होतं. मात्र पाटकर यांनी त्याला नकार दिला . यामुळेच राऊत त्यांच्यावर चिडल्याचं स्वप्ना पाटकरांनी सांगितलं आहे. स्वप्ना पाटकरांचे विभक्त झालेले पती सुजय पाटकर देखील संजय राऊतांचे निकटवर्तीय होते. एप्रिलमध्ये ईडीने संजय राऊत यांचा अलीबागमधील ११ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली. ही मालमत्ता संजय राऊतांच्या पत्नी वर्षा राऊत आणि स्वप्ना पाटकर या दोघींच्या नावावर आहे.
प्रविण राऊत यांनी जमीन गैरव्यवहारातील पैसे वेगवेगळ्या नातेवाईकांच्या खात्यावर वळविले असं ईडीने म्हंटलंय. प्रविण राऊत यांच्या पत्नी माधूरी राऊत यांच्याकडून संजय राऊतांच्या पत्नी वर्षा राउत यांनी ८३ लाख घेतले, याच पैशातून फ्लॅट खरेदी केल्याचा आरोप ईडीने केलाय. पत्रा चाळ गैरव्यवहारातील पैसा अलीबागची संपत्ती खरेदी करण्यासाठी वापरल्याचा संशय ईडीला आहे. दरम्यान भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी अनेकदा पत्राचाळ प्रकरण उचलून धरलं होतं. त्यांनी पोलिस स्टेशनमध्ये जाऊन स्वप्ना पाटकर यांची तक्रार नोंदविली जावी अशी विनंती पोलिसांना केली होती. स्वप्ना पाटकर या मात्र याविषयी काहीही सांगत नाहीएत. त्या कोणाच्याही फोनला उत्तर देखील देत नाहीएत. तर संजय राऊतांना PMLA कोर्टाने ४ ऑगस्टपर्यंत ED कोठडी सुनावलीय.