लोकप्रवाह, चोपडा दि. ०३ आॕगस्ट – शहरातील अमरचंद सभागृह, नगर वाचन मंदिर येथे भारतीय कमुनिस्ट पक्षाचे 24 वे अधिवेशन घेण्यात येणार आहे. त्याची तयारी करण्यासाठी तालुक्यातील भाकप पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक घेण्यात आली. आज क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे ज्येष्ठ नेते वासुदेव कोळी हे होते. यावेळी कॉम्रेड अमृत महाजन यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यानंतर झालेल्या चर्चेत काॕ. शांताराम पाटील, रमेश पाटील, संतोष कुंभार, हिराबाई सोनवणे, विकास कोळी, पुंडलिक अजब सिंग राजपूत आदिंनी विचारविनिमय करून जबाबदाऱ्या वाटून घेतल्या.
भारतीय कम्युनिस्ट पक्ष जळगाव जिल्ह्यात 85 वर्षापासून कार्यरत असून या पक्षाच्या नेतृत्वाखाली शेतकरी, शेतमजूर, कामगार, आदिवासी, कष्टकरी व महिला यांचेवरील अन्याय व अत्याचार दूर करणेसाठी तसेच त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी आजपर्यंत पक्षाने हजारो छोटे-मोठे आंदोलने केली आहेत. त्यामुळे या वर्गामध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाला विशेष मानाचे स्थान आहे. महाराष्ट्र भाकप चे राज्य अधिवेशन अमरावती येथे सप्टेंबर महिन्यात होणार आहे. त्याअगोदर प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा अधिवेशने घेण्यात येत आहेत. त्यानुसार ७ ऑगस्ट रोजी रविवारी चोपडा येथे सकाळी 10 वा मिरवणूक व अधिवेशन होईल अशी माहिती पक्षाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
पत्रकात पुढे म्हटले आहे की, चोपडा येथे 1985 नंतर प्रथमच जिल्हा अधिवेशन होत आहे. चोपडा तालुक्याला स्वातंत्र्य चळवळीच्या काळात व नंतर कॉम्रेड बि.डी.गुजराथी, कॉम्रेड जीवन गुजराथी, लतिकाबेन गुजराथी, अमृत भिवजी बाविस्कर, कॉ. पंडित धनगर घोडगाव, कॉ.माधव नारायण धनगर, जुलाल चंदू लंके अकुलखेडा, लक्ष्मण सुखदेव पाटील यांनी शेतकरी, शेतमजूर, कामगार, शिक्षक व टपरीधारक वर्गासाठी मुंबई पासून चोपड्या पर्यंत केलेल्या संघर्षाची व त्यागाची परंपरा राहिली आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा चोपडे तालुक्यातील आदिवासींच्या जमीन मागणीसाठी चोपडा ते जळगाव असा पायी लाँग मार्च कॉम्रेड स.ना.भालेराव, व्ही बी मोरे, आंबोडेकर, वेसता बारेला यांचे नेतृत्वात काढण्यात आला होता. त्याची शिदोरी घेऊन चोपडा येथे जिल्हा अधिवेशन घेण्याचा निर्णय झाला आहे.
या जिल्हा अधिवेशनासाठी महाराष्ट्र भाकपचे राज्य सहसचिव काॕम्रेड सुभाष लांडे ( नगर ) व कॉम्रेड प्रा. डॉ. राम बाहेती मार्गदर्शन करणार आहेत. अशी माहिती पक्षाचे राज्य कमिटी नेते कॉम्रेड अमृत महाजन व जिल्हा सचिव लक्ष्मण शिंदे यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे. अधिवेशनाच्या तयारीसाठी कॉम्रेड अमृत महाजन यांच्या मार्गदर्शनात काॕ. शांताराम पाटील, संतोष कुंभार ,पुंडलिक पाटील, रमेश पाटील, हिराबाई सोनवणे, जिजाबाई राणे प्रेमसिंग बारेला, बाळू लोहार, वासुदेव कोळी, अंबालाल राजपूत, पक्षाचे खजिनदार काॕ. सुरेश सिंधी आदींची समिती तयार करण्यात आलेली आहे असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
Post Views: 188