लोकप्रवाह, चोपडा दि. ०५ – नगरपालिके अंतर्गत विविध विभागांमार्फत कामे वेळेवर होत नसल्याने किंवा संबंधित अधिकारी व कर्मचारी यांचे दुर्लक्ष असल्यामुळे प्रचंड समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. यासाठी दि. ४ रोजी सकाळी साडेअकरा वाजता जनसंघर्ष मोर्चा ने नगरपालिकेतील मुख्याधिकारी दालनात धडक मोर्चा नेला. यावेळी जनसंघर्ष मोर्चामधील सदस्यांनी अनेक समस्या मांडल्या. या समस्या ऐकून मुख्याधिकारी हेमंत निकम यांनी त्यांच्या डायरीमध्ये नोंद करून येत्या पंधरा दिवसात या सर्व समस्यांचा निपटारा करण्याचे आश्वासन यावेळी दिले. त्यावेळेस या जनसंघर्ष मोर्चाचे समाधान झाले. बांधकाम अभियंता व पाणीपुरवठा चा प्रभार असलेले अभियंता सचिन गवांदे यांच्या उपस्थितीत थेट त्यांच्यासमोर टक्केवारी घेण्याचे आरोप या जनसंघर्ष मोर्चा तर्फे करण्यात आले. मोठ्या प्रमाणात टक्केवारी ठेकेदारांकडून घेतली जाते. त्यामुळेच कामे निकृष्ट होत असतात असा आरोप थेट मुख्याधिकारी हेमंत निकम यांच्यासमोर गवांदे यांच्यावर आरोप करण्यात आला. जन संघर्ष मोर्चाचे प्रमुख अमृतराज सचदेव यांनी मुख्याधिकारी यांच्या दालनात त्यांना सांगितले की, अधिकारी विकास कामांचे कॉन्ट्रॅक्टर ठेकेदारांकडून कमिशन (टक्केवारी) घेत असतात, त्यामुळे कामे निकृष्ट दर्जाची होतात. मग शहरात झालेली सगळेच कामे रस्ते असो किंवा इतर कामे असतील ती निकृष्ट झालेली आहेत, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
बालाजी संस्थानचे अध्यक्ष प्रवीण गुजराथी यांनी यावेळी सांगितले, की बालाजी महाराजांचे वहने सध्या चोपडा शहरात कानाकोपऱ्यात फिरवली जात आहेत. ही वहने फिरवताना रस्ते नसल्यामुळे अक्षरशः वहने मागे वळून फिरून घेत जाऊन दुसऱ्या मार्गाने घेऊन जावे लागत आहेत. त्यामुळे रस्त्यांची कामे करावीत आणि बऱ्याचशा वाढीव शहरातील भागात सर्वत्र लाईट बंद असतात. खांब्यांवरील लाईट सुरु करावेत आणि शुक्रवारी शहरातून रथ नेहमीच्या ठरलेल्या मार्गावरून निघणार आहे त्या रस्त्यावरील खड्डे बुजण्यात यावेत अशी मागणी त्यांनी केली. माजी नगरसेवक डॉ. रवींद्र पाटील यांनी गाऱ्हाणे मांडताना सांगितले की, या पंचवार्षिक पूर्वी शहरात चार दिवसात पाणीपुरवठा होत होता. तेव्हा केवळ तीनच जलकुंभ होते.आता मात्र पाच जलकुंभ नवीन झाल्याने सुद्धा आठ ते दहा दिवसाआड पाणीपुरवठा होतो. म्हणून दोन दिवसात पाणीपुरवठा व्हावा अशी समस्या मांडली. तसेच ज्या दिवशी शहरात पाणीपुरवठा बंद राहणार असेल त्यादिवशी शहरात दवंडी देऊन लोकांना माहिती द्यावी, कारण शेती कामासाठी जाणारे लोक केवळ पाणी भरण्यासाठी मोल मजुरी बंद ठेवून घरी थांबतात आणि त्याच दिवशी पाणी न आल्यामुळे त्यांचा रोजगारही बुडत असतो. तसेच काही भागांमध्ये दिवसभर खांब्यांवर लाईट सुरू असतात. दिवसही लाईट सुरू असल्यामुळे वीज वाया जाते. म्हणून शहरातील सार्वजनिक लाईट बंद करण्याची व्यवस्था करावी. घनकचरा बाबत बोलताना ठिकठिकाणी कचराकुंडी ठेवाव्यात आणि रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. शहरात थाळनेर दरवाजा ते राणी लक्ष्मीबाई चौक पर्यंतचे रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय आहे, हा रस्ता तात्काळ करावा. अतिशय वर्दळच्या आणि रहदारीचा हा रस्ता असल्यामुळे त्याचे काम मार्गी लावावे.
नंदकिशोर अग्रवाल यांनी सांगितले की, लहान भोई वाड्यातील काँक्रीट रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे केलेले आहे. त्या ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना काळे यादीत टाकावे. तसेच रस्त्याचे काम त्यांनी नवीन करून द्यावे असे गाऱ्हाणे मांडले. गोपाळ सोनवणे यांनी समस्या मांडताना सांगितले की, चोपडा नगरपालिकेत कोट्यवधी रुपयांचा प्रचंड निधी आला. मात्र न.पा. प्रशासन त्यासाठी कमी पडले. कस्तुरबा हायस्कूल पासून ते बायपास पर्यंतच्या झालेल्या डांबरीकरण रस्ता पूर्णपणे निकृष्ट झाला आहे. काम सुरू असताना या रस्त्यावर आपल्या विभागाचा एकही इंजिनियर कधीच दिसला नाही. या ठेकेदारांवर व संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल होऊन या रस्त्याचे निकृष्ट काम होण्यामागील खरे कारण टक्केवारी असल्यामुळे टक्केवारी घेतल्याने इंजिनियर्स त्या कामावर जातच नाहीत आणि म्हणून कामे निकृष्ट होत असल्याचे त्यांनी थेट यावेळी सचिन गवांदे यांच्यावर आरोप केला आणि संबंधित ठेकेदारांकडून हे काम नवीन करावे अशी मागणी केली. नरेश महाजन यांनी भाजीपाला मार्केटच्या अनेक समस्या आहेत. शेजारी असलेले चिकन मार्केट व मटन मार्केटमध्ये प्रचंड घाण असते आणि त्याचा त्रास भाजीपाला मार्केटमध्ये होत असतो. भाजीपाला मार्केटमध्येही अनेक समस्या आहेत. त्या सोडवण्यासाठी आपण प्रत्यक्ष पाहणी करावी असे सांगितले. नरेंद्र तोतला आणि प्रवीण जैन यांनी मेन रोड गोल मंदिर पासून तर बोहरा गल्ली मार्ग पर्यंतचा रस्त्यात मध्ये दयनीय अवस्था झाली असून सदर रस्त्याचे काम तात्काळ व्हावे असे गाऱ्हाणे मांडले.
याच समस्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता वीरेंद्र राजपूत यांच्यासमोर जाऊन या जनसंघर्ष मोर्चाने या विभागामार्फत केलेले काम निकृष्ट असून निकृष्ट कामे होण्यामागे केवळ टक्केवारी हिच कीड असल्याचे नमूद केले. अधिकाऱ्यानी टक्केवारी घेणे बंद करावे.निश्चितच कामे चांगले होतील. ठेकेदारांनाही वठणीवर आणता येईल अशी प्रतिक्रिया जन संघर्ष मोर्चा कडून देण्यात आली. यावेळी अमृतराज सचदेव, प्रवीण गुजराथी, डॉ. रविंद्र पाटील, गजेंद्र जयस्वाल, नरेश महाजन, पुंडलिक महाजन, समाधान माळी, संतोष अहिरे, गोपाळ सोनवणे, अशोक बाविस्कर, नरेंद्र तोतला, संजय श्रावगी,समाधान सपकाळे, संजय वाघ, नंदकिशोर अग्रवाल, अजय पालीवाल, नरेश सोनार, श्याम जाधव, सचिन जयस्वाल, गिरीष पालीवाल, प्रवीण जैन आदिंची उपस्थिती होती.
Post Views: 291