लोकप्रवाह, चोपडा दि. १० डिसें. (संदिप ओली) – केंद्र सरकारच्या शक्ती व गती अभियानांतर्गत अमळनेर – चोपडा रेल्वेमार्गाची चाचपणी करण्यात आली. यावेळी अमळनेर येथील रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी एल. बी. सिंग (वाहतूक निरिक्षक), वाणिज्य निरिक्षक राजेंद्र देसाई, वरिष्ठ अनुभाग अभियंता राजेंद्र पाटील, वरिष्ठ अनुभाग अभियंता ओमप्रकाश यांनी पातोंडा ग्रामपंचायतीला भेट दिली.
जळगाव जिल्ह्यात चोपडा, नंदुरबार जिल्ह्यात शहादा, अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर, बुलढाणा जिल्ह्यात चिखली आदि ५० हजारापेक्षा अधिक लोकसंख्या असणारी शहरे केंद्र सरकारच्या शक्ती व गती अभियान अंतर्गत रेल्वेने जोडली जाणार आहेत. यामुळे या शहराचे सांस्कृतिक व व्यापारी महत्व वाढीस लागण्यास सहकार्य होईल.
– राजेंद्र पाटील, वरिष्ठ अनुभाग अभियंता, अमळनेर
केंद्र सरकारने संपूर्ण भारतातील ५० हजारांपेक्षा जास्त लोकवस्ती असणाऱ्या शहरात रेल्वेच्या ब्रॉडगेज लोहमार्गाने जोडण्यासाठी चोपडा या शहराचा त्यात समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यातील अमळनेर, चाळीसगाव, पाचोरा सारखी इतर शहरे यापूर्वीच रेल्वेने जोडली गेली असल्याने सद्या चोपडा शहर हे ५० हजारापेक्षा जास्त लोकसंख्येचे शहर असल्याने अमळनेर ते चोपडा रेल्वेमार्गाची चाचपणी रेल्वे प्रशासनामार्फत सुरु करण्यात आली आहे. अमळनेर ते चोपडा दरम्यान असलेली व्यापारी दृष्ट्या व भौगोलिक दृष्ट्या महत्वाच्या ठिकाणांना भेटी देऊन सर्वेक्षणाचे काम रेल्वे प्रशासनामार्फत सुरु असताना या दरम्यान पातोंडा येथे भेट देऊन सरपंच भरत बिरारी यांनी गावातील बँका, पतपेढी, सेवाभावी संस्था, प्राचीन मंदिरे, तीर्थक्षेत्र, चहार्डी येथील साखर कारखाना, जीनिंग व उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने प्रस्तावित रेल्वेमार्ग महत्वाचा ठरेल अशी माहिती दिली. यावेळी सरपंच भरत बिरारी, उपसरपंच नितीन पारधी, विकासो. संचालक किशोर मोरे, कर्मचारी राकेश पाटील, राजेंद्र वाणी, बाजीराव पवार, विश्वास बोरसे, रोजगारसेवक सुनिल चित्ते व ग्रामस्थ प्रा. भूषण बिरारी, घनशाम पाटील, ईश्वर पाटील व अर्जुन लोहार आदी उपस्थित होते.