टिम लोकप्रवाह, वर्धा दि. १२ (सचिन ओली) – जिल्ह्यातील देवळी तालुक्यात शनिवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसासह गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. हरभरा, गहू, तूर, कापूस यासह भाजीपाला पिके जमिनदोस्त झाली. नुकसानीबाबत शेतकरी पीकविमा कंपनीच्या ऑनलाईन संकेतस्थळावर व टोल फ्री नंबरवर 72 तासांच्या आत तक्रार करावयाची आहे. मात्र यात तांत्रिक अडचण येत असल्याचे समोर आले आहे. याबाबत आमदार रणजित कांबळे यांनी पत्र लिहित जिल्हाधिकारी यांना निर्देश देताच जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी पीकविमा बाबत ऑनलाईन पद्धतीत अडचण येत असल्यास शेतकऱ्यांनी तालुक्याच्या पीक विमा कार्यालयात अथवा प्रतिनिधीना वैयक्तिक अर्ज देण्याचे आदेश दिले. आमदारांच्या पुढाकाराने शेतकऱ्यांना होत असलेली अडचण तातडीने दूर झाली. सोबतच ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला नाही, त्या शेतकऱ्यांचे देखील नुकसानीचे पंचनामे करून सरकारकडे मदतीचा प्रस्ताव तत्काळ पाठवून शेतकऱ्यांना संकटातून सावरण्यासाठी आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी सुद्धा आमदार रणजित कांबळे यांनी केली.
पीक विमा धारक शेतकऱ्यांना नुकसानीच्या ७२ तासांच्या आत तक्रार करणे बंधनकारक असते. मात्र, पीक विम्यासंदर्भात तक्रार करावयाच्या ऑनलाइन पद्धतीत अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारीच होत नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महसूल विभाग, कृषी विभाग, तसेच पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींना शेतकऱ्यांच्या तक्रारी नोंदविण्याच्या संदर्भात येणारी तांत्रिक अडचण दूर करण्याबाबत सूचना कराव्या, ज्या गावात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, तेथील अधिकाऱ्यांमार्फत शेतकऱ्यांची तक्रार नोंदवून घ्यावी.
खरीप हंगामात सुद्धा अनेक पीक विमाधारक शेतकऱ्यांना मदत मिळाली नसल्याची तक्रार माझ्याकडे प्राप्त झाली आहे. यामुळे रब्बी हंगामात शेतकऱ्यांना अडचणींना समोर जावे लागणार नाही, अशी व्यवस्था यंत्रणेमार्फत उभारून शेतकऱ्यांच्या नुकसानीची दखल घेण्यात यावी. सोबतच ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला नाही, त्या शेतकऱ्यांचे सुद्धा पंचनामे करून सरकारकडे मदतीचा प्रस्ताव तातडीने पाठवून त्यांना या संकटातून सावरण्यासाठी मदत करावी, अशी मागणी आमदार रणजित कांबळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली. या निवेदनावर जिल्हा प्रशासनाने तातडीने पाऊल उचलल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.