टिम लोकप्रवाह, चोपडा दि. १३ – आपण आपल्याच चूकांतून कधीतरी शिकतो. ‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा’ या उक्तीनुसार इतरांच्या चूकांतून शिकणं यालाच आजच्या काळात हुशारी म्हणतात. दहावी-बारावीनंतर आपले करिअर निवडताना आपल्याला हवे ते क्षेत्र निश्चित निवडावे परंतु त्यापूर्वी त्याक्षेत्रात आपल्याला यश मिळाले नाही तर आपला प्लॅन बी तयार असू द्यावा, असे मत हरताळकर हाॅस्पिटलचे संचालक डाॅ. अमित हरताळकर यांनी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना व्यक्त केले. चोपडा येथील विवेकानंद विद्यालयात दहावीचा निरोप समारंभ भावनिक वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी चैतन्य पाटील, जैनब तडवी, सत्यम सोनवणे, तनीष लाठी, लतिका निकम, अवनी वानखेडे, तेजस्विनी पाटील या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून त्यांच्या बालांगणापासून तर दहावीपर्यंतचे अनुभव व्यक्त करुन आपल्या भावनांना मोकळी वाट करुन दिली. याप्रसंगी उपस्थित सर्व हळवे झाले होते. शिक्षकांमधून संदीप कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले.
विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना डाॅ. अमित हरताळकर म्हणाले की, मी तुम्हाला मार्गदर्शन वगैरे करायला आलेलो नसून तुमच्याशी गप्पा मारायला आलोय. मी तुमच्या वयात असताना माझ्याकडून ज्या चूका झाल्या त्या तुमच्याकडून होऊ नये यासाठी तुम्हाला काय करता येईल हे तुम्हाला सीनियर म्हणून सांगायला आलोय. दिलखुलास संवाद साधताना त्यांनी त्यांच्या आयुष्यातील स्वतःचे व काही मित्र-मैत्रिणींचे अनुभव सांगितले. तसेच योग्यवेळी भावनांचा आदर करावा परंतु भावनांच्या आहारी जाऊ नये. आपला आनंद कशात आहे त्यानुसार आपल्याला करिअर निवडता यायला हवे. समाज काय म्हणेल यापेक्षा आपल्याला स्वतःला काय वाटते व काय साध्य करता येईल याचा विचार करावा. हे नमूद करतांना त्यांनी त्यांच्या एका मित्राचे उदाहरण सांगितले. आपल्या संवादी शैलीने त्यांनी सर्व विद्यार्थ्यांची मने जिंकली. जेव्हा केव्हा अडचणी आल्या आणि गप्पा माराव्याश्या वाटल्या तर नक्कीच माझ्यासोबत गप्पा मारायला यावे, असे सांगून सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी व भावी वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष डाॅ. विजय पोतदार, संस्थापक अध्यक्ष डाॅ. विकास हरताळकर, उपाध्यक्ष घनश्याम अग्रवाल, सचिव ॲड. रवींद्र जैन, मुख्याध्यापक नरेंद्र भावे, आशा चित्ते, प्राचार्य पी. जी. पाटील आदिंसह सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व इयत्ता दहावी व बारावीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक नरेंद्र भावे यांनी केले. तर सूत्रसंचालन संदीप कुलकर्णी यांनी, पाहुण्यांचा परिचय पवन लाठी यांनी व आभार जावेद तडवी यांनी मानले. कार्यक्रम संपल्यानंतर सर्व उपस्थितांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 14 - येथील चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी वेले येथील बेवारस मनोरुग्ण उपचार व पुनर्वसन...
टिम लोकप्रवाह, चोपडा - तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये असलेल्या आदिवासी पटट्यातील गौऱ्यापाडा येथील आरोपी बाप संजय नानसिंग पावरा (वय 23) याने स्वतःच्या...