चोपडा (प्रतिनिधी) : जळगांव जिल्ह्यात इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून सुरक्षा कीट तसेच संसारोपयोगी साहित्याचे वाटप करण्याचे काम सुरू झाले आहे. मात्र, त्याकरीता आवश्यक स्मार्ट कार्डासाठी दलालांकडून १४०० ते १५०० रूपये सक्तीने वसूल केले जात असल्याने कामगारांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. त्यातच दोन ते तीन दिवसांपासून चोपडा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सुरक्षा कीट तसेच संसारोपयोगी साहित्याचे वाटप करण्याचे काम सुरु होते मात्र या कामात सुद्धा अनियमितता असल्यामुळे कित्येकांना रिकाम्या हातांनी परतावे लागले आहे. त्यामुळे कामगार लाभार्थ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, बांधकाम कामगारांना जिल्हा कामगार कार्यालयाकडून काही महिन्यापासून साहित्य वाटप सुरू आहे. हे वाटप जरी टप्प्याटप्प्याने होत असले तरी यामध्ये दलाल घुसले आहेत. कामगार कार्यालयाकडून कामगारांसाठी आवश्यक साहित्य पुरवण्याची महत्वकांक्षी योजना राबविली जात आहे. मात्र, हे दलाल कार्यालयातील कर्मचाऱ्यांना हाताशी धरून कामगारांची लूट करत आहेत. संबंधित दलाल मजुरांकडून एक हजार ते पंधराशे रुपये केवळ कागदपत्रे नोंदणी करून घेण्यासाठी व नंतर पेटी मिळवून देण्यासाठी आणखी पैसे घेत आहेत. नोंदणी झालेल्या कामगारांना तारीखेनुसार वाटप सुरू आहे. आपल्याला साहित्य मिळावे म्हणून कामगार कोणतीही पर्वा न करता पहाटे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात धाव घेत आहेत. काही कामगार तर तेथेच मुक्काम ठोकत आहेत. मात्र काही विशिष्ट दलालामार्फत पेट्या वाटप होत असल्याने ताटकळत बसलेल्या कामगाराना रिकाम्या हातानेच परतण्याची वेळ येत आहे.
स्वतःच्या घरापासून दूर ऊन, वारा व पावसात जिवाची पर्वा न करता काम करणाऱ्या बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. त्यामाध्यमातून नोंदणीकृत पुरुष व महिला कामगागारांना सुरक्षा साधनांसह संसारोपयोगी साहित्य देखील वाटप करण्यात येते. मात्र, त्यासाठी आवश्यक स्मार्ट कार्ड काढण्याकरीता तब्बल दीड हजार रूपयांची सक्तीने वसुली तसेच भांडी संचासाठी ८०० तर सुरक्षा पेटीसाठी ५०० रुपयांची वसुली सुरू आहे. बांधकाम कामगारांच्या ताटातील घास पळवणार्या या दलालांच्या आणि त्यांना मदत करणार्या कर्मचाऱ्यांची तातडीने चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी कामगारांकडून होत आहे.
ज्या प्रमाणे प्रत्येक योजनेसाठी लोकांची धावपळ बघायला मिळते. ते बघून मन सुन्न होत आहे. कारण की ज्या गरजू लोकांना या योजनेचा लाभ मिळायला हवा ते सोडून ज्यांना गरज नाही असे लोकही या योजनेचा लाभ घेण्यासाठी रांगेत उभे असल्याचे दिसून येत आहे. माझ्या शेजारच्याने लाभ घेतला मग मि का नाही ही मानसिकता आता बदलायला पाहिजे. जो खरंच कामगार आहे त्याच व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळायला हवा.. नाहीतर दलालांमुळे जो नाही तो पैसे देऊन लाभार्थी होऊ पाहतोय..