टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 28 : विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, सामाजिक जबाबदारी आणि नेतृत्वगुण विकसित करण्यासोबतच ग्रामीण विकासाला शैक्षणिक संस्थेची साथ मिळावी, या उद्देशाने महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयाने वेले-आखतवाडे गाव दत्तक घेतले आहे. महाविद्यालय आणि ग्रामपंचायत वेले-आखतवाडे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘दत्तक गाव योजने’चा शुभारंभ वृक्षारोपणाने उत्साहात करण्यात आला.

महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. संदीप सुरेश पाटील तसेच संस्थेच्या सचिव डॉ. स्मिता संदीप पाटील यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यावेळी महाविद्यालय आणि ग्रामपंचायत वेले-आखतवाडे यांच्यात सर्वांसमक्ष सह्या करून सामंजस्य करार करण्यात आला. या माध्यमातून ग्रामस्थ, विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्या सहभागातून गावाच्या स्थानिक गरजा लक्षात घेऊन विविध विकासात्मक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

विकासाच्या विविध अंगांवर भर
‘दत्तक गाव योजने’अंतर्गत गावातील स्वच्छता, व्यसनमुक्ती, महिलांचे आरोग्य व सबलीकरण, शेतीपूरक उद्योग-व्यवसायांना चालना यांसह विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. गावाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाला गती देतानाच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सामाजिक कार्याचा अनुभव देण्यावरही भर दिला जाणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संध्या एम. सोनवणे होत्या. महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. शैलेशकुमार वाघ यांनी प्रास्ताविकातून योजनेची उद्दिष्टे स्पष्ट केली. गावाचा विकास केवळ पायाभूत सुविधांपुरता मर्यादित न ठेवता सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने विविध उपक्रम राबविणे ही या योजनेमागील प्रमुख भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.
ग्रामस्थांच्या सहभागातून विकासाला बळ
ग्रामपंचायत वेले-आखतवाडेच्या सरपंच सौ. प्रतिभाबाई जिजाबराव पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना या उपक्रमामुळे गावाच्या विकासाला निश्चितच नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. ग्रामस्थांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून महाविद्यालयाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्या डॉ. संध्या एम. सोनवणे यांनी, “आपली उपस्थिती व सहकार्य हेच या उपक्रमाचे खरे बळ आहे,” असे सांगितले. व्यसनमुक्ती, महिला आरोग्य, महिला सबलीकरण आणि शेतीपूरक व्यवसाय यांसारख्या उपक्रमांमुळे वेले-आखतवाडे गावाच्या विकासाला गती मिळेल. तसेच या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक संवेदनशीलतेचे प्रत्यक्ष धडे शिकता येतील, असे त्यांनी नमूद केले.
यावेळी महात्मा गांधी शिक्षण मंडळ, चोपडा गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य छगन नारायण पाटील, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. ए. बी. सूर्यवंशी, उपप्राचार्य प्रा. डॉ. बी. एम. सपकाळे, उपप्राचार्य पी. एस. पाडवी, समन्वयक डॉ. शैलेशकुमार वाघ, ग्रामपंचायत वेले-आखतवाडेच्या सरपंच प्रतिभाबाई जिजाबराव पाटील, उपसरपंच आरती मोहनसिंग परदेशी, ग्रामपंचायत सदस्य सविता विनोद पाटील, ग्रामपंचायत सदस्य सुशील भावलाल सोनवणे, माजी सरपंच विनोद सुधाकर पाटील, दत्तक गाव योजनेचे समन्वयक डॉ. डी. एस. पाटील आणि सह-समन्वयक निरंजन नरेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ. डी. एस. पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ, महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमास ग्रामस्थ, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.













