केजीएन कॉलनीत डेंग्यू प्रतिबंधासाठी जनजागृती; कॉर्नर मीटिंगद्वारे नागरिकांना डेंग्यूची लक्षणे, धोके व प्रतिबंधात्मक उपायांची माहिती

0
IMG-20260824-WA0227

टिम लोकप्रवाह, चोपडा | दि. २४ ऑगस्ट २०२६

शहरी आरोग्य केंद्राच्या वतीने डेंग्यू आजाराबाबत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी सोमवार, दि. २४ ऑगस्ट रोजी केजीएन कॉलनी परिसरात कॉर्नर मीटिंगचे आयोजन करण्यात आले. यावेळी नागरिकांना डेंग्यू आजाराची कारणे, लक्षणे, संभाव्य धोके तसेच डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी घ्यावयाची खबरदारी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या जनजागृती बैठकीस  नगरपालिकेचे आरोग्य व स्वच्छता सभापती रमेश शिंदे, नगरसेवक फरहानअली सय्यद, वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रकांत बारेला, पर्यवेक्षक जगदीश बाविस्कर यांच्यासह आरोग्य विभागातील कर्मचारी तसेच परिसरातील डॉक्टर मंडळी उपस्थित होती.

उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करतांना वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रकांत बारेला

 

यावेळी डॉ. चंद्रकांत बारेला यांनी नागरिकांना डेंग्यू आजाराबाबत सविस्तर माहिती देताना, डेंग्यू कसा होतो, त्याची प्रमुख लक्षणे कोणती आहेत आणि योग्य वेळी उपचार न मिळाल्यास हा आजार गंभीर स्वरूप धारण करू शकतो, याबाबत नागरिकांना विविध उदाहरणांद्वारे समजावून सांगितले. घराच्या परिसरात, छतावर, अंगणात किंवा इतर ठिकाणी पाणी साचून राहिल्यास त्यामध्ये डासांची पैदास होऊ शकते. त्यामुळे पाण्याची भांडी नियमितपणे रिकामी करून स्वच्छ ठेवणे, तसेच परिसरात पाणी साचणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

डेंग्यूची लक्षणे जाणवल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच वैद्यकीय सल्ला व उपचार घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. नागरिकांनी आपल्या घरासोबतच परिसराच्या स्वच्छतेची जबाबदारीही स्वीकारावी, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले. या जनजागृती उपक्रमाला केजीएन कॉलनीतील रहिवाशांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या सूचनांचे पालन करून डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी सहकार्य करण्याची ग्वाही नागरिकांनी दिली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिसरातील नागरीक तसेच औषध निर्माण अधिकारी नदीम शेख, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका तसेच आशा स्वयंसेविका आदींनी परिश्रम घेतले.

“स्वच्छ परिसर, साचलेल्या पाण्याची विल्हेवाट आणि डासांची उत्पत्ती रोखणे” यासाठी नागरिकांनी सामूहिकपणे प्रयत्न केल्यास डेंग्यूचा धोका निश्चितच कमी करता येईल, असा संदेश या जनजागृती कार्यक्रमातून देण्यात आला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!