
चोपडा, दि. १५ ऑगस्ट २०२६ : जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी (ग.स. सोसायटी), चोपडा शाखेच्या विद्याविहार येथील मुख्य कार्यालयात भारताचा ८०वा स्वातंत्र्य दिन उत्साहपूर्ण व देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी तालुका आरोग्य सहाय्यक तथा आरोग्य कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी विजय योगराज देशमुख यांच्या हस्ते सकाळी ८.४५ वाजता राष्ट्रध्वजारोहण करण्यात आले.

ध्वजारोहणापूर्वी राष्ट्रध्वजाचे विधिवत पूजन करण्यात आले. राष्ट्रध्वज फडकताच उपस्थितांनी राष्ट्रगीताचे सामूहिक गायन करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी परिसर देशभक्तीच्या उत्साहाने भारून गेला.

यावेळी ग.स. सोसायटीचे ज्येष्ठ संचालक रमेश एकनाथ शिंदे, माध्यमिक पतपेढी जळगावचे माजी रत्नाकर हिम्मतराव बाविस्कर, ग.स. सोसायटीचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक सुनील अभिमन्यू सूर्यवंशी, कर्मचारी नियंत्रण समितीचे अध्यक्ष मंगेश रमेश भोईटे, संचालक योगेश जगन्नाथ सनेर, स्वीकृत संचालक एकनाथ पाटील यांच्यासह ग.स. सोसायटीचे अधिकारी-कर्मचारी व आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आरोग्य सेवेला सन्मानाची पावती
आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहणाचा मान देणे, ही त्यांच्या कर्तव्यनिष्ठा आणि जनसेवेचा गौरव करणारी बाब असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. कोरोना महामारीपासून लसीकरण, माता-बाल आरोग्य, साथरोग नियंत्रण, आरोग्य जनजागृती तसेच ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्यासाठी आरोग्य कर्मचारी सातत्याने कार्यरत आहेत. त्यांच्या या सेवाभावी कार्याची दखल घेत ग.स. सोसायटीने दिलेला हा सन्मान प्रेरणादायी असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
यावेळी आरोग्य सहाय्यक सुनील महाजन, सुनील भालेराव, आरोग्य सेवक पुष्पजीत सोनवणे, जि.प. आरोग्य कर्मचारी संघटनेचे तालुका अध्यक्ष संदीप शिंदे, तसेच विविध आरोग्य कर्मचारी, संघटनेचे पदाधिकारी व आशा कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाखाधिकारी प्रवीण सत्तेसा यांनी केले तर मंगेश भोईटे यांनी आभार मानले.
राष्ट्रध्वजाला मानवंदना, आरोग्य सेवेचा गौरव आणि देशभक्तीचा उत्साह, या त्रिवेणी संगमाने ग.स. सोसायटी चोपडा शाखेचा स्वातंत्र्य दिन सोहळा संस्मरणीय ठरला.









