चोपडा | प्रतिनिधी : चोपडा शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. बसस्थानक परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम सुरू झाले असून, चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी तसेच प्रवाशांमध्ये सुरक्षिततेबाबत जनजागृती करण्यासाठी ५ ते ६ सूचना फलकही लावण्यात आले आहेत.
चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी बसस्थानक परिसराला भेट देऊन प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याबाबत डेपो मॅनेजर संदेश क्षीरसागर यांच्याशी चर्चा केली होती. यावेळी बसस्थानक परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. पोलिसांच्या या सूचनेला सकारात्मक प्रतिसाद देत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
बसस्थानकासारख्या सतत वर्दळ असलेल्या ठिकाणी गर्दीचा फायदा घेत प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू, मोबाईल व पैशांवर चोरांकडून डल्ला मारला जाण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेऊन पोलिसांच्या वतीने प्रवाशांना सावध करणारे ५ ते ६ जनजागृती फलक बसस्थानक परिसरात लावण्यात आले आहेत.

या फलकांद्वारे एस.टी. बसमध्ये चढताना-उतरताना मौल्यवान वस्तू व पैशांची विशेष काळजी घेण्याचे, पाकीट व मोबाईल सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचे, अनोळखी व्यक्तींवर सहज विश्वास न ठेवण्याचे तसेच संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाल आढळल्यास तत्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
‘सावध प्रवासी, सुरक्षित प्रवास’ या भावनेतून करण्यात आलेल्या या उपाययोजनांमुळे बसस्थानक परिसरातील सुरक्षितता अधिक बळकट होण्यास मदत होणार आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे एखादी चोरी अथवा अनुचित घटना घडल्यास संबंधित व्यक्तींचा शोध घेणे आणि तपासाला दिशा देणे पोलिसांना अधिक सुलभ होणार आहे.

दरम्यान, पोलीस प्रशासनाने केलेल्या सूचनेनंतर डेपो व्यवस्थापनाने तातडीने सकारात्मक पाऊल उचलल्याने प्रवाशांकडून समाधान व्यक्त होत आहे. बसस्थानकात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशानेही स्वतःच्या मौल्यवान वस्तूंबाबत दक्षता बाळगावी आणि कोणतीही संशयास्पद बाब निदर्शनास आल्यास पोलिसांना तत्काळ कळवावे, असे आवाहन चोपडा शहर पोलिसांकडून करण्यात आले आहे.









