टिम लोकप्रवाह, दि. 18 : चोपडा शहर पोलीस ठाणे येथे ईद-ए-मिलाद सणाच्या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मोहल्ला कमिटी व शांतता समितीची बैठक घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी चाळीसगाव परिमंडळाचे अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते उपस्थित होते. यावेळी चोपडा उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्यासह चोपडा शहर पोलीस निरीक्षक पवन देसले व ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, अडावदचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तसेच शहरातील विविध मुस्लिम मोहल्ल्यांतील पंच कमिटीचे सदस्य, मौलवी आणि मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

बैठकीत ईद-ए-मिलादची मिरवणूक प्रशासनाने दिलेल्या परवानगीच्या मार्गावरूनच काढण्याच्या सूचना देण्यात आल्या. मिरवणुकीदरम्यान कोणत्याही प्रकारच्या आक्षेपार्ह घोषणा अथवा इशारे करणे, विनाकारण ध्वज फडकावणे तसेच शस्त्रांचे प्रदर्शन करणे टाळावे, अशा स्पष्ट सूचना पोलिस प्रशासनाकडून देण्यात आल्या. तसेच मिरवणूक शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी सर्वांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.

दरम्यान, मिरवणुकीपूर्वी अथवा मिरवणुकीदरम्यान चुकीच्या पद्धतीने व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर प्रसारित करू नयेत, अशाही सक्त सूचना देण्यात आल्या. कोणत्याही व्यक्तीच्या गैरवर्तनामुळे किंवा चुकीच्या कृत्यामुळे शहरातील शांतता व सुव्यवस्थेला बाधा निर्माण झाल्यास संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांनी दिला.

ईद-ए-मिलादचा सण शांतता, सलोखा आणि सामाजिक ऐक्याच्या वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व समाजघटकांनी सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.









