टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने समाजकार्य महाविद्यालयातील पारंगत भाग-२च्या विद्यार्थ्यांनी क्षेत्रकार्यांतर्गत चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप केले.

समाजकार्याच्या माध्यमातून गरजू व रुग्ण व्यक्तींना आधार देणे, त्यांच्याशी आपुलकीने संवाद साधणे तसेच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी आणि सेवाभावाची भावना रुजविणे, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी रुग्णांची आस्थेने विचारपूस करून त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली आणि त्यांना फळांचे वाटप केले.

यावेळी चोपडा समाजकार्य महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा क्षेत्रकार्य पर्यवेक्षक प्रा. डॉ. आशिष गुजराथी, महिला मंडळ व्हॉलंटरी स्कूल, चोपडा येथील मुख्याध्यापक श्री. अरुणभाई सदानशिव तसेच क्षेत्रकार्याचे विद्यार्थी वर्षाराणी पाटील, जयेश पावरा, कृष्णा भालेराव, आकाश पावरा, किरण पावरा, आनंद पावरा, अविनाश पावरा, सुहास पावरा आणि शिवाजी पावरा उपस्थित होते.
या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष क्षेत्रकार्याच्या अनुभवातून समाजसेवेची संधी मिळाली. रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांनी विद्यार्थ्यांच्या या सेवाभावी उपक्रमाचे कौतुक केले. सामाजिक संवेदना जपत समाजकार्याच्या शिक्षणाला प्रत्यक्ष कृतीची जोड देणारा हा उपक्रम ठरला.













