टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी स्वतंत्र विशेष तपास पथक (SIT) स्थापन करून चौकशी करावी, अशी मागणी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

या प्रकरणात निरीक्षण अधिकारी मनीषा रमेश माजरखेडे आणि सेल्समन योगेश भाले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याचे नमूद करत दोड यांनी 619 रेशन कार्डे एका स्वस्त धान्य दुकानाकडे वळविणे, अतिरिक्त गहू, तांदूळ व ज्वारी मंजूर करणे तसेच शासकीय लॉगइन आयडीच्या वापराबाबत सखोल चौकशीची मागणी केली आहे.
ई-पॉस व्यवहार, रेशन कार्ड हस्तांतरणाची डिजिटल हिस्ट्री, धान्य मंजुरी, प्रत्यक्ष उचल व लाभार्थ्यांना झालेले वितरण यांचे डिजिटल आणि कागदोपत्री पुरावे तातडीने सुरक्षित करावेत, अशी मागणीही करण्यात आली. तसेच केवळ एका दुकानापुरती चौकशी न करता वर्धा जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानांचे मागील पाच वर्षांचे विशेष ऑडिट करावे, अशी मागणी आहे.
दोषी आढळणाऱ्या अधिकारी, कर्मचारी, दुकानदार किंवा मध्यस्थांवर कठोर कारवाई करून शासनाचे झालेले आर्थिक नुकसान संबंधितांकडून वसूल करावे आणि चौकशी वेळबद्ध पद्धतीने पूर्ण करून निष्कर्ष जनतेसमोर जाहीर करावा, अशी मागणी दोड यांनी केली.
“गरीबांच्या हक्काच्या धान्याचा हिशोब जनतेला मिळालाच पाहिजे. एसआयटी चौकशी होईपर्यंत आणि फरार आरोपींना अटक होईपर्यंत आपचा पाठपुरावा सुरू राहील,” असा इशारा श्रीकांत दोड यांनी दिला.
निवेदन देताना जिल्हा सचिव संजय आचार्य, तालुका अध्यक्ष समीर खान, कुणाल लोणारे, संदीप भगत आदी उपस्थित होते.














