लोकप्रवाह, चोपडा दि. १६ : येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयाच्या भूगोलशास्त्र विभागातर्फे जागतिक ओझोन दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून व्यासपीठावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एन.एस.कोल्हे आणि भूगोल विभागातील प्राध्यापक उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात वसुंधरा पूजन करून झाली. याप्रसंगी प्रा. मुकेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना “ओझोन क्षय, परिणाम व उपयोजना” या विषयावर मार्गदर्शन केले. जागतिक ओझोन दिन पार्श्वभूमी, महत्त्व व जागतिक ओझोन दिन साजरा करण्याचा उद्देश याबाबत विद्यार्थ्यांशी हितगुज केले. तसेच वसुंधरेचे सुरक्षा कवच असणाऱ्या ओझोन थराला जर मानवाच्या बेजबाबदार वृत्तीमुळे धोका निर्माण होत असेल तर तो धोका या वसुंधरेवरील संपूर्ण जीवसृष्टीला आहे. ओझोन थर क्षय होण्यासाठी कारणीभूत असणाऱ्या घटकांना, घटनांना जर मानवाने वेळीच नियंत्रणात आणून पूर्णपणे आळा घातला नाही तर याची सर्वस्वी किंमत मानवाला व सोबतच संपूर्ण परीसंस्थेला मोजावी लागेल. म्हणूनच वसुंधरेचे संरक्षण कवच ओझोनचे पर्यायाने या संपूर्ण वसुंधरेवर सजीवांचे अस्तित्व अबाधित टिकवून ठेवणे काळाची नितांत गरज आहे. ओझोन थराचे व सोबत वसुंधरा संवर्धन हे मानवाचे आद्य कर्तव्य असून ते त्याचे प्रामाणिकपणे पालन झाले तरच जीवसृष्टी वसुंधरेवर चिरकाल शाश्वतरीत्या टिकेल. तसेच केवळ जागतिक ओझोन दिन साजरा करण्याचे सोपस्कार पार पाडून न थांबता प्रत्यक्ष कृतीतुन विद्यार्थ्यांनी समाजात ओझोन थर व वसुंधरा संवर्धन यासाठी शर्थीचे प्रयत्न केले पाहिजे या शब्दात प्रा. पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा एन.एस.कोल्हे यांनी विद्यार्थ्यांना समाजातील जबाबदार, जागरूक घटक म्हणून या ओझोन दिनाच्या निमित्ताने समाजात जनजागृती केली पाहिजे. लोकांपर्यंत ओझोन थराबाबत माहिती पोहोचवली पाहिजे आणि ओझोन क्षयासाठी जबाबदार असणारे विविध घटक आणि मानवी कृती यांना स्थानिक पातळीवर कसा आळा घालता येईल याबाबत सक्रिय राहिले पाहिजे. सोबतच पृथ्वी मानवाचे घर असून ते स्वच्छ, सुंदर आणि संतुलित ठेवण्यासाठी बांधिल असले पाहिजे तरच घेतलेल्या ज्ञानाचा उपयोग झाला असे म्हणता येईल. विद्यार्थ्यांनी देखील या पर्यावरणाची, वसुंधरेची व ओझोन थराच्या संवर्धनाची जबाबदारी गांभीर्यपूर्वक घेतली पाहिजे, असे विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले.
यावेळी प्रा. संगिता पाटील, प्रा. एस.एम.खैरनार, प्रा. एम.बी.पावरा, प्रा. ज्ञानेश्वर सोनवणे, प्रा. संदिप पाटील व राजू निकम यांचेसह कर्मचारी वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भूगोलशास्त्र विभागातील प्राध्यापक, विद्यार्थी आणि कर्मचारीवृंद यांनी परीश्रम घेतले.
Post Views: 378