चोपडा | दि. १२ ऑगस्ट २०२६ : महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित श्रीमती शरच्चंद्रिका सुरेश पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निक), चोपडा येथे राष्ट्रीय ग्रंथालय दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त ग्रंथालयशास्त्राचे जनक पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासोबतच ग्रंथालयाचा शैक्षणिक आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी प्रभावीपणे उपयोग करण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. यावेळी संस्थेचे प्राचार्य प्रा. व्ही. एन. बोरसे यांनी मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीमध्ये ग्रंथालयाची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले.

“वाचाल तर वाचाल” या विचारातून विद्यार्थ्यांनी नियमित वाचनाची सवय जोपासावी, विविध विषयांतील ज्ञान आत्मसात करावे आणि ग्रंथालयाचा अधिकाधिक उपयोग करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
डॉ. एस. आर. रंगनाथन यांनी भारतातील ग्रंथालय चळवळीला दिलेल्या अमूल्य योगदानाचे स्मरण करून त्यांच्या कार्याला आदरांजली वाहण्यात आली. ज्ञान, वाचन आणि संशोधनाची संस्कृती विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याचा संकल्पही यावेळी व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमास संस्थेचे उपप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच संबंधित विभागातील कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रंथालय विभागाने विशेष परिश्रम घेतले.









