
टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. १७ जुलै : डोंबिवली येथील शास्त्रीनगर महानगरपालिका रुग्णालयातील महिला डॉक्टर, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांवर स्थानिक लोकप्रतिनिधीकडून झालेल्या अमानुष हल्ल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) चोपडा शाखेतर्फे तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, रुग्णसेवेसाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांवरील हा हल्ला अत्यंत निषेधार्ह, धक्कादायक व संतापजनक असून, तो वैद्यकीय व्यवसायाच्या प्रतिष्ठेवर तसेच लोकशाही मूल्यांवर आघात करणारा आहे. या घटनेस जबाबदार असलेल्या सर्व संबंधितांवर तातडीने कठोर व आदर्शवत कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी आयएमए चोपडा शाखेने केली आहे.
यावेळी डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी उपाययोजना राबविण्यात याव्यात तसेच अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी शासनाने कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणीही करण्यात आली.
याप्रसंगी आयएमए चोपडा शाखेचे अध्यक्ष डॉ. जगदीश सरवैया, सचिव डॉ. राहुल पवार, डॉ. महेंद्र जैस्वाल, डॉ. पराग पाटील, डॉ. लोकेंद्र महाजन, डॉ. विनीत हरताळकर, डॉ. अमित हरताळकर, डॉ. दुर्गेश जैस्वाल, डॉ. सचिन काटे, डॉ. स्मिता पराग पाटील, डॉ. नीता जैस्वाल तसेच डॉ. प्रतिभा पाटील उपस्थित होते.









