टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण, अखंड नामजप, भजन, आरती व विविध धार्मिक कार्यक्रमांनी परिसर भक्तिरसाने न्हाऊन निघाला. संपूर्ण केंद्र आकर्षक फुलांची सजावट, विद्युत रोषणाई आणि स्वामी समर्थांच्या जयघोषाने उजळून निघाले होते.

सात दिवसांच्या या धार्मिक सोहळ्यात श्री स्वामी समर्थांचे पारायण, अखंड नामस्मरण, सामूहिक प्रार्थना तसेच भक्तीमय वातावरणात विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळपासूनच भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले व गुरूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली.

यावेळी अनेक स्वामीभक्तांनी श्रद्धाभावाने गुरुपद स्वीकारले. गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व अधोरेखित करणारा हा सोहळा अत्यंत भावनिक आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. मोठ्या संख्येने उपस्थित भक्तांनी नामस्मरण करत गुरूंच्या चरणी स्वतःला अर्पण केले.
कार्यक्रमात महाआरती, प्रसाद वितरण तसेच भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि बालकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतल्याने संपूर्ण परिसर मंगलमय वातावरणाने भारावून गेला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातील सर्व सेवेकरी, पदाधिकारी व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. उपस्थित भाविकांनी आयोजनाचे कौतुक करत, अशा धार्मिक कार्यक्रमांमुळे समाजात श्रद्धा, संस्कार आणि अध्यात्माची जपणूक होत असल्याची भावना व्यक्त केली.









