चोपडा : आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी असलेल्या डायल ११२ या हेल्पलाइनवर आत्महत्येबाबत खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याचा प्रकार चोपडा तालुक्यातील विरवाडे येथे समोर आला आहे. या प्रकरणी २५ वर्षीय तरुणाविरुद्ध चोपडा शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम २१२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी सुमारे १२.४० वाजता चोपडा शहर पोलीस ठाण्याच्या डायल ११२ यंत्रणेला एका व्यक्तीचा कॉल आला. विरवाडे येथील मरीआई मंदिराजवळ एका पुरुषाने गळफास घेतल्याची माहिती कॉलरने दिली आणि तातडीने मदत मागितली. कॉल मिळताच कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार अतुल अनिल मोरे आणि योगेश कोळी यांनी शासकीय वाहनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी पाहणी केली असता तेथे गळफास घेतल्याची कोणतीही घटना घडलेली नसल्याचे स्पष्ट झाले.

यानंतर पोलिसांनी कॉलरशी संपर्क साधून चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. तपासात कॉल करणारा रामसिंग भावसिंग बारेला (वय २५, रा. विरवाडे, ता. चोपडा, जि. जळगाव) असल्याचे समोर आले. पोलिसांनी गावातील पोलीस पाटील महारू हरी कोळी तसेच संशयिताचे वडील भावसिंग बारेला यांना बोलावून चौकशी केली. यावेळी रामसिंग हा घरच्यांना नेहमी त्रास देत असून, पोलिसांना त्रास देण्याच्या उद्देशाने त्याने हा खोटा कॉल केल्याचे समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी पोलीस अंमलदार अतुल मोरे यांच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलीस ठाण्यात BNS कलम २१२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षकांच्या आदेशाने पुढील तपास महेंद्र साळुंखे करीत आहेत. दरम्यान, डायल ११२ ही नागरिकांच्या सुरक्षेसाठी असलेली आपत्कालीन सेवा असून, तिच्यावर खोटी माहिती देऊन पोलिसांचा वेळ व यंत्रणा वाया घालवणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.








